सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा बाजारपेठेतील मुख्य नाक्यावर 'भाजपा प्रवेश देणे आहे' असा बॅनर लावण्यात आल्याने एकच खळबळ उडाली असून त्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. शिरोडा शहरात बॅनर लावल्याने चर्चेचा विषय बनले आहेत. दरम्यान हे पोस्टर विरोधकांनी लावले की या पक्ष प्रवेशाला कंटाळलेल्या भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण नागपुरातील मोक्याच्या ठिकाणी 'भाजपात प्रवेश देणे आहे' अशा फलकांनी नागपूरकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा निशाणा साधणारा कोण, हा औत्सुक्याचा विषय ठरला आहे. नागपूरसह पुण्यात देखील अशाच प्रकारचे बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र हे बॅनर कुणी लावले, याबाबत मात्र माहिती मिळालेली नाही.
असेच पोस्टर अमरावती शहरात देखील लावले आहेत. दरम्यान, हे पोस्टर्स कुणी लावले, याबाबत माहिती होऊ शकली नाही. राजकमल चौकात लावण्यात आलेल्या मोठ्या फ्लेक्सवर हे बॅनर लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, संपर्कासाठी टोल फ्री नंबरसुद्धा देण्यात आला आहे. एखाद्या शाळा किंवा महाविद्यालयाच्या प्रवेश जाहिरातीशी मिळतीजुळती ही जाहिरात तयार करण्यात आली आहे. राजकमल चौकात दर्शनी भागात ती लावण्यात आल्याने अमरावतीकरांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. हे फ्लेक्स नेमके कुणी लावले, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनादेश यात्रेला गुरुकुंज मोझरी येथून हिरवी झेंडी दाखविली जाणार आहे. या मेळाव्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शाह हे देखील उपस्थित राहणार आहेत.
भरतीसाठी या आहेत अटी शर्थी
अट ईडी आणि आयकर विभागाची नोटीस आली असल्यास प्राधान्य
भ्रष्टाचाराचा अनुभव असल्यास पहिली पसंती
सहकार क्षेत्र बुडविल्याचा अनुभव हवा
तसेच बॅनरवर टीप ही देण्यात आली असून त्यात विचारधारेची कोणतेही अट नाही. तसेच आमच्याकडे जागा नसल्यास मित्र शाखेत अॅडजेस्ट करता येईल, असे नमूद करून संपर्कासाठी 8980808080 हा टोल फ्री नंबर असा देण्यात आला आहे.