सोलापूर : प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कोणता ना कोणता छंद जोपासत असतो. शहरी भागात लहानपणापासून मुलांना असे छंद जोपासायची सवय लागलेली असते. मात्र माढा तालुक्यातील लऊळसारख्या ग्रामीण भागातील एका शेतमजुराने जोपासलेला देशी-विदेशी पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह खरंच कौतुकास्पद आहे.

महादेव डांगे यांची माढा तालुक्यातील लऊळ येथे 22 गुंठे शेती आहे. घरची हलाखीची परिस्थिती असल्याने शाळकरी वयापासून मजुरीची सवय असलेले महादेव यांना चौथीमध्ये शिकत असताना पोस्टाच्या तिकिटाचे महत्व एका प्रसंगावरून समजले आणि तेव्हापासून त्यांना ही तिकिटे संग्रह करण्याचा नादच लागला. गेली 40 वर्षे महादेव यांनी हा छंद जपला जोपासलाच नाही, तर या तिकिटांसाठी आलेली लाखो रुपयांची ऑफर धुडकावून त्यांनी पुढच्या पिढीसाठी हा संग्रह जपून ठेवला आहे.



महादेव डांगे यांचे कुटुंब लऊळ जवळील एका वस्तीवरील झोपडीत राहतात. वडिलोपार्जित 22 गुंठे शेतीत कुटुंबाचा चरितार्थ चालणे अवघड असल्याने मुलगा आणि महादेव हे दोघेही मजुरीचे काम करतात. महादेव हे चौथीमध्ये असताना त्यांना एक पोस्टाचे जुने तिकीट मिळाले होते. हे तिकीट त्यांच्याकडून एकाने दीड रुपायाला विकत घेतले आणि ही तिकिटं खूपच मौल्यवान असतात. याचा महादेव यांना साक्षात्कार झाला. मग लऊळसारख्या भागात राहूनही शाळकरी महादेव यांनी तिकिटं गोळा करण्यास सुरुवात केली. तरुणपणी कामासाठी महादेव पुण्यात स्थलांतरित झाले. इथे काम करताना अशी पुरातन तिकिटांच्या शोधातच असे. पेंटिंगचे काम करताना पुणे आणि परिसरात  लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवत त्यांच्याकडून मजुरी कमी मिळाली तरी घ्यायची, मात्र त्यांच्याकडे असलेल्या जुन्या पाकिटांवरील तिकिटे मात्र ते न लाजता मागून घेत.

महादेव यांची ही आवड पाहून पुण्यातील कॅम्प परिसरात काम करताना, त्यांना अनेक विदेशी तिकिटे मिळाली. महादेव यांची आवड पाहून पुण्यातील एका निवृत्त अधिकाऱ्याने त्यांच्याजवळील काही जुनी तिकिटांचा संग्रह दिल्यावर आभाळाला गवसणी घातल्याचा आनंद महादेव याला झाला. काही दिवसातच महादेव यांच्याकडे भारत, पाकिस्तान, इंग्लंड, फ्रांस, आफिका अशा अनेक देशातील पुरातन तिकिटांचा संग्रह तयार झाला.

काही वर्षांपूर्वी त्याच्याकडील तिकिटांचा संग्रहाची माहिती घेऊन कोलकात्याच्या एका डॉक्टरने फोन करून सर्व तिकिटांचा संग्रह दोन कोटी रुपयांना मागितला होता. हातावर पोट असणाऱ्या कोणालाही ही रक्कम फारच मोठी असते, मात्र तरीही महादेव यांनी आपली जपलेली आवड विकण्यास नकार दिला.



आज महादेव यांनी वयाची पन्नाशी गाठली आहे. गेली 40 वर्षे जपलेला आपला हा संग्रह शाळेतील विद्यार्थ्यांनी पाहावा याची माहिती घ्यावी हा त्यांचा उद्देश होता. आता ते पुन्हा आपल्या लऊळ या गावी येऊन पुन्हा आपल्या भागात मजुरी करू लागले आहेत.

आता त्यांचा मुलगाही मजुरीला जातो, पण हे तिकिटांच्या संग्रहाचे त्यांचे वेड आजही तसेच आहे. आजही महादेव आणि त्यांच्या पत्नीने हा संग्रह झोपडीतील एका पेटाऱ्यात जपून ठेवला आहे. आपला संग्रह ग्रामीण भागातील मुलांनी पाहावा आणि त्यातून माहिती घ्यावी ही त्यांची इच्छा असली तरी आजच्या मोबाईलच्या जमान्यात महादेव यांच्या तिकिटांचा संग्रह या मुलांसाठी आजही आऊट ऑफ कव्हरेज आहे.