सोलापूर : आयआरबीने सोलापूर-धुळे महामार्गाचं काम पूर्ण होण्याच्या अगोदरच टोल वसुली सुरु केली आहे. सोलापूर-धुळे महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील सोलापूर ते येडशी शंभर किलोमीटरच्या चौपदरीकरणाचं काम अंतिम टप्पात आहे. मात्र काम पूर्ण होण्याच्या अगोदरच मध्यरात्रीपासून तामलवाडी ते येडशी या दरम्यानचे दोन टोल सुरू झाले. हे टोल 26 वर्षे सुरू राहणार आहेत.


100 किलोमीटरच्या या रस्त्यादरम्यान तामलवाडी आणि येडशी या दोन ठिकाणी टोल आहेत. प्रकल्पाचं काम शंभर टक्के पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली करायला परवानगी देणार नाही, असं केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत छातीठोकपणे सांगितलं होतं. गडकरींच्या या आश्वासनाचं काय झालं, असा प्रश्न वाहनधारकांनी उपस्थित केला आहे.

सोलापूर ते येडशी हा 100 किलोमीटरचा प्रवास वेगाने सुरू झाला आहे. केवळ 60 मिनिटात हे शंभर किलोमीटरचं अंतर पार होतंय. सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 च्या शंभर किलोमीटरच्या टप्प्याचं काम जवळपास पूर्ण होत आहे. त्यामुळे 75 टक्के काम पूर्ण झाल्याचं सांगत आयआरबीने आजपासून (मंगळवार) या मार्गावरचे दोन टोल सुरू केले आहेत.

टोलचे दर कसे असतील?

100 किलोमीटरच्या या रस्त्यादरम्यान तामलवाडी आणि येडशी या दोन ठिकाणी टोल आहेत. दोन्ही ठिकाणचे टोल मिळून 100 रुपये कारचालकाला द्यावे लागतील. अवजड वाहनांसाठी  650 रुपये दर आहे. ट्रक आणि बससाठी हा टोल 340 रुपये असेल. तीन चाकी व्यापारी वाहनांसाठी 270, हलक्या व्यापारी वाहनांसाठी 85 रुपये आणि 75 रुपये टोल द्यावा लागेल.

जुन्या सरकारच्या काळातल्या टोल धोरणावरून प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. प्रकल्पाचं काम पूर्ण न होताच टोल वसुली सुरू होत होती. सत्ताबदल झाल्यानंतर भाजप सत्तेवर येताच प्रकल्पाचं काम 100 टक्के पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली करायला परवानगी देणार नाही, असं नितीन गडकरींनी संसदेत सांगितलं होतं. मात्र गडकरींचं हे केवळ 'आश्वासन'च होतं का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.