मुंबई : महाराष्ट्रातील नेते म्हणतात की दिल्लीतून माझं लोकसभेचं तिकीट कापलं गेलं, तर दिल्लीतील नेते म्हणतात की महाराष्ट्रातील नेत्यांनी तिकीट कापलं. मी किमान वकिली शिकायला हवी होती,  लोकसभेचं तिकीट तरी वाचलं असतं असं वक्तव्य भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन यांनी केलं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेल्या पूनम महाजन यांचं तिकीट कापून ते अॅड. उज्ज्वल निकम यांना देण्यात आलं होतं. त्यावर पूनम महाजन यांनी हे वक्तव्य केलं. पूनम महाजन या एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होत्या. 


Poonam Mahajan On Majha Katta :  काय म्हणाल्या पूनम महाजन?


पूनम महाजनांची दिल्लीतील कंपनी त्यांना तिकीट न मिळण्यासाठी कारणीभूत असल्याची चर्चा आहे. त्यावर प्रश्न विचारला असता पूनम महाजन म्हणाल्या की, "महाराष्ट्रातील नेते म्हणतात दिल्लीने ठरवलं होतं. दिल्ली म्हणतेय महाराष्ट्रानं ठरवलं होतं. त्यामागचं कारण अद्याप मला माहिती नाही. मी फुटबॉल जास्त पाहत नाही, पण आता आवडेल फुटबॉल बघायला. दिल्लीतील कंपनीत तिकीट कापणार अशी कुजबूज नव्हती. ती कुजबूज फक्त महाराष्ट्रातच होत होती. ते लवकरच समजेल. मला कुणीतरी म्हटलं की तू वकिली शिकायला हवी होती. एखाद्यावेळी तिकीट तरी वाचलं असतं."


Poonam Mahajan On Lok Sabha Election : तिकीट मिळणार नाही याचा अंदाज नव्हता


सलग दोन वेळा खासदार असतानाही यंदाच्या लोकसभेला भाजपने तिकीट का नाकारलं असा प्रश्न विचारला असता पूनम महाजन म्हणाल्या की, "2009 च्या विधानसभआ निवडणुकीत घाटकोपरमधून माझा पराभव झाला होता. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ हा सुद्धा काँग्रेसचा गड होता. त्यामुळे कोण लढायला तयार नव्हते. मात्र आम्हाला वाटलं आम्ही ही सीट काढू शकतो. 2014 साली मुंबई उत्तर मध्यमधून मला भाजपने तिकीट दिलं. त्यावेळी आणि त्यानंतर असे दोन वेळेस मी विजयी झाले. यावेळी लोकसभेचं तिकीट मिळणार नाही याचा अंदाज नव्हता. तसा अंदाज आला असता तर मी कामाला सुरुवात केली नसती. मला अंदाज आला असता तर मी त्या हिशोबाने काम केलं असतं."


मी माझ्या वडिलांना पाहात आले आहे, त्यांच्या आजूबाजूला नेहमी राजकीय कुजबूज व्हायची. पण त्यांनी ते कधीही मनावर घेतलं नाही. तसाच मी देखील प्रयत्न करत होते असं पूनम महाजन म्हणाल्या. 


Poonam Mahajan On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे घरच्यांप्रमाणे वागले


उद्धव ठाकरे आणि महाजन कुटुंबीयांच्या संबंधावर पूनम महाजन यांनी भाष्य केलं. त्या म्हणाल्या की, "प्रमोद महाजन ज्यावेळी रुग्णालयात होते त्यावेळी उद्धव ठाकरे लंडनला निघत होते. त्यांनी फ्लाईट कॅन्सल केली. 12 दिवस जसे गोपीनाथ मुंडे साहेब फिरत होते तसेच उद्धवजी संध्याकाळी पाच-सहा वाजता रुग्णालयात यायचे आणि तीन तास बसायचे. अगदी घरातल्या माणसांप्रमाणे वागायचे."


संबंध ताणले ते भाजप आणि ठाकरेंमध्ये, आमच्यामध्ये नाही


ठाकरे आणि महाजन कुटुंबीयांच्या संबंधावर बोलतान पूनम महाजन म्हणाल्या की, "तिकीट कापल्यानंतरचा विषय नाही. मी आतादेखील ठाकरे कुटुंबातील व्यक्तींशी बोलते. महाजन घराणं म्हणजे ठाकरेंएवढं मोठं नाही. पण प्रमोदजी आणि बाळासाहेबांचं असलेलं प्रेम हे राजकारणाच्या पलिकडे होतं. आता पक्षांच्या युती या फार सुपरफास्ट होतात. याच्यावर मी फार खुलेपणाने बोलते. त्याकाळी प्रमोदजी महाराष्ट्रभर फिरत होते. प्रत्येक तालुक्यात फिरले. प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांनी विचारलं की, युती हवी आहे का? त्याच्यावर विलेपार्लेच्या निवडणुकीची टेस्टही झाली. आमची युती कधी-कधी तुटलीदेखील आहे. छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुकीतही युती तुटली होती. त्यावरही प्रमोदजींनी फार छान भाष्य केलं होतं. पण उद्धवजी आणि रश्मी वहिनींबरोबर असलेले माझे संबंध हे राजकारणाच्या पलिकडे आहेत. एकमेकांच्या सुखदुःखात आम्ही साथ देतो. सध्या जे संबंध ताणले गेलेत ते भाजप आणि ठाकरेंमध्ये ताणले गेलेत, आमच्यामध्ये नाहीत. याला मी महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांना जबाबदार धरते." 


ही बातमी वाचा: