मुंबई : मुस्लिम आरक्षणसाठी आज भिवंडी ते आझाद मैदान लाँग मार्च काढण्यात आला. मुस्लिम रिझर्व्हेशन फेडरेशनच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांसह मालेगावचे काँग्रेसचे आमदार आसिफ शेखही या लाँग मार्चमध्ये सामिल झाले होते. मात्र घेतलेली परवानगी रद्द केल्यामुळे पोलिसांनी खारेगाव टोलनाक्याजवळ लाँग मार्च अडवून आंदोलकांना ताब्यात घेतलं.

मुस्लिम समाजाला देण्यात आलेला पाच टक्के आरक्षण कायम करावे या मागणीसाठी हा लाँग मार्च काढण्यात आला होता. हा मोर्चा मुंबई नाशिक महामार्गावरुन आझाद मैदानात धडकणार होता. मात्र त्याआधी पोलिसांनी मार्च अडवून कारवाई केली आणि आमदार आसिफ शेख यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

मुस्लिम समाजाच्यावतीने पाच टक्के आरक्षणासाठी तसेच त्यांच्या इतर मागण्या घेऊन हा मोर्चा आझाद मैदानावर धडकणार होता. परंतु सरकार दडपण आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आमदार आसिफ शेख यांनी केला आहे. परंतु हा संघर्ष सुरूच राहणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मुस्लिम समाजाच्यावतीने विशाल मोर्चा काढण्यात येईल आणि त्याला सर्वस्व सरकार जवाबदार राहील, असं आसिफ शेख म्हणाले.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या कारवाईचे निषेध केला आहे. मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी काँग्रेस आमदार आसिफ शेख यांनी पदयात्रा सुरु केली होती. मात्र या मागणीची दखल घेण्याऐवजी पोलिसांनी त्यांना रस्त्यातचं ताब्यात घेतले. लोकहिताच्या मागणीसाठी पदयात्रेसारख्या लोकशाही मार्गाने आंदोलन करु दिले जात नसेल, हे निषेधार्ह आहे, असा ट्वीट विखे पाटील यांनी केलं आहे.