इंदापूर : इंदापूर विधानसभेची जागा कोणत्या पक्षाला देणार हे लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर करावं, अशी मागणी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांसह नेत्यांनी केली आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना साकडं घालण्यात आलं आहे.


महाआघाडी ही सन्मानपूर्वक असावी, काँग्रेस पक्ष वाढला पाहिजे, सोबतच मित्रपक्षही वाढवा. आमचा गळा कापून किंवा आमच्या छाताडावर पाय देऊन पुढे जाऊ नका, अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीला सबुरीचा सल्ला दिला.


इंदापूर नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभात पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. या कार्यक्रमाला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, रमेश बागवे, आमदार संग्राम थोपटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी हजेरी लावली.


आम्ही लोकसभेत आघाडी धर्म पाळून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम करतो. मात्र राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणुकीत नेहमीच दगाफटका होतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी विधानसभेची जागा कोणत्या पक्षाला हे जाहीर करावं. अन्यथा आम्ही लोकसभेत आघाडीचं काम करणार नाही, अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी जाहीर केली.


रामदास आठवलेंच्या भाजप-सेना युतीवर नाराजीबाबतही पृथ्वीराज चव्हाणांनी आपल्या खास शैलीत टोला लगावला. रामदास आठवले यांनी मूळ विचार सोडून भाजपची साथ दिली. मंत्रीपद भोगलं आणि आता ते नाराज असल्याचं सांगतात. मात्र त्यांना किती गांभीर्यानं घ्यायचं याचा जनतेनं विचार करायला हवा. तसेच त्यांनी वेगळी भुमिका घेतली तरी फार काही फरक पडणार नसल्याचं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.