नागपूर : नागपुरातील निवृत्त पोलिस कर्मचारी बाबाराव ढोमणे यांचा प्लॉट हडपून त्यांना मंदिरात राहण्यास भाग पाडणाऱ्या भूमाफियांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर पोलिसांच्या हालचालींना वेग आला आहे.


आरोपी असलेले काँग्रेसचे नगसेवक हरीश ग्वालबंसी आणि त्यांच्या 10 ते 12 साथीदारांविरोधात गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दंगली आणि खंडणी मागण्यासारख्या गुन्ह्यांची नोंद करुन पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

काय आहे प्रकरण?

नागपुरात सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी बाबाराव ढोमणेंनी आयुष्यभराच्या पुंजीतून घेतलेला प्लॉट काही भूमाफियांनी हडप केल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तिथे झोपडपट्टी उभी झाली. त्यामुळे एखादा छोट्याशा घरात उर्वरित कुटुंबाला ठेऊन बाबाराव ढोमणे नावाचा हा वृद्ध पोलीस मंदिरात राहण्यास मजबूर झाला आहे.

नागपुरातील पोलीस मुख्यालयाला लागून असलेल्या हनुमान मंदिरात बाबाराव ढोमणे दिवस काढत आहेत. याच मंदिरात 62 वर्षीय बाबाराव ढोमणे काम करत असतात.

62 वर्षांचे बाबाराव ढोमणे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहेत. मात्र, पोलीस दलातील आयुष्यभराच्या कमाईमधून पै पै जोडून जमविलेल्या पुंजीतून घेतलेला त्यांचा प्लॉट काही भूमाफियांनी हडप केला. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर बाबाराव आज मंदिरात राहण्यास मजबूर झाले आहेत.

“कुटुंबाला एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये ठेवले असून तिथे जागा कमी पडत असल्याने मंदिरात राहत आहे. सकाळ- संध्याकाळ जेवायला घरी जातो आणि मग मंदिरात येऊन राहतो. अनेक वेळेला तक्रार केली मात्र काहीच झाले नाही”, असं बाबाराव ढोमणे सांगतात.     

बाबाराव ढोमणे आणि इतर अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षांआधी नागपूरच्या दाभा रोड परिसरात नर्मदा हाऊसिंग सोसायटीमध्ये प्लॉट खरेदी केले होते. एक हजार पाचशे चौरस फुटाच्या प्लॉट वर टुमदार घर बांधू आणि सेवानिवृत्तीनंतर कुटुंबासह तिथे राहू असं स्वप्न बाबाराव पाहत होते.

मात्र, काही भूमाफियांनी त्या ठिकाणी कब्जा केला. आज सोसायटीच्या काही हिश्श्यावर झोपडपट्टी उभी आहे. तर उर्वरित भागात सिमेंटची भिंत उभारून प्लॉट धारकांना तिथे येण्यास मज्जाव करण्यात येत आहे.

बाबाराव ढोमणे यांचा आरोप आहे की नागपुरातून काँग्रेस पक्षाचे विद्यमान नगरसेवक हरीश ग्वालबंसी यांनीच इतरांना पुढे करत ती जागा बळकावली आहे. त्यांनीच त्या ठिकाणी भिंत बांधली आहे. त्यामुळे बाबाराव ढोमणे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात काँग्रेस नगरसेवक हरीश ग्वालबंसी विरोधात प्लॉट बळकावल्याची तक्रार नोंदवली होती.

पोलिस कर्मचारी बाबाराव ढोमणे यांची व्यथा एबीपी माझाने मांडल्यानंतर प्रशासन खडाडून जागं झालं आणि पोलिसांनी आरोपींविरोधात कारवाई सुरु केली आहे.

संबंधित बातमी : भूमाफियामुळे माजी पोलिसावर मंदिरात राहण्याची वेळ