मुंबई : उन्हाने अंगाची काहिली होत असताना आता कोकणवासियंना थोडा गारवा अनुभवायला मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावल्यानंतर आता कोकणातही पावसाची शक्यता आहे.

येत्या 24 तासांत दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातील काही भागात गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.

काल सांगली आणि वाशिम जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची तारांबळ उडाली.

राज्यातील सर्वच जिल्ह्यात उन्हाचे चटके बसत आहेत. अगदी महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणीही तापमानाने तिशी पार केली. रायगडमधील भीरामध्ये तर सर्वोच्च तापमानाची नोंद झाली. त्यामुळे पावसाच्या शिडकाव्याने उन्हाची काहिली काही प्रमाणात कमी होऊन, लोकांना गारवा अनुभवायला मिळेल, एवढं निश्चित.