बीड : स्त्री भ्रूण हत्येतील आरोपी असलेल्या सुदाम मुंडे याने जामीनावर बाहेर येताच पुन्हा एकदा रुग्णालय सुरू केलं होतं. त्यानंतर त्याच्यावरती आरोग्य विभागाने छापा टाकला होता. याच प्रकरणामध्ये डॉक्टर सुदाम मुंडे हा परळी शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस कोठडीमध्ये आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण आठ जणांचे जवाब पोलिसांनी नोंदवले आहे. औषध विभागाने परळीतील एका मेडीकल चालकाला या प्रकरणी नोटीस बजावली आहे.


परळीपासून तीन किलोमीटर अंतरावर परळी नंदागोळ या रोडवर स्वतःच्या शेतामध्ये सुदाम मुंडे आणि मुंडे हॉस्पिटल अशी पाटी लावून रुग्णालय सुरू केलं होतं. त्याच्या वरती आरोग्य विभागाने छापा टाकला असता यामध्ये डिजीटल सोनोग्राफी मशीनसह गर्भपाताला लागणाऱ्या साधनसामग्रीचा समावेश होता. यावेळी जप्त करण्यात आलेली सोनोग्राफी मशीन ही फक्त रेडिओलॉजिस्ट लाच घेण्याचा अधिकार असतानाही डॉक्टर सुदाम मुंडे याला ही मशीन कशी दिली याचा तपास पोलिसांनी केलाय. ही मशीन विकणाऱ्या व्यक्तीला चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.


याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोळ्या औषधांचा साठा जप्त करण्यात आला. यामध्ये अँटिबायोटिक तसेच इंजेक्शन्स, सलाईनच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. या औषधावर असलेल्या बॅच नंबर वरून अन्न व औषध विभागाने तपासाला सुरुवात केली आहे. परळी शहरातील मोंढा परिसरात असणाऱ्या श्री मेडिकल मधून औषध आणल्याचा प्राथमिक तपास लावण्यात आला आहे. या प्रकरणी श्री मेडिकल स्टोअर चालकाला आपलं म्हणणं मांडण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.


सुदाम मुंडे प्रकरण : एक्स रे मशीनची होणार चौकशी, फार्मासिस्ट शिवाय गोळ्या-औषधे कोणी दिले याची होणार चौकशी


सुदाम मुंडे याच्या रुग्णालयावर छापा टाकल्यानंतर याठिकाणी गोळ्या औषधाचे कोणतेही रेकॉर्ड आढळून आलेले नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ज्या श्री मेडिकल चालकाच्या विरोधामध्ये नोटीस बजावण्यात आली. त्याच्याकडे सुद्धा या औषधाचा कुठलाही रेकॉर्ड पाहायला मिळत नाही. म्हणून कोणतेही रेकॉर्ड न ठेवतासुद्धा मुंडे यांना गोळ्या औषधांचा पुरवठा केला जात होता का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.


सुदाम मुंडे याच्या बेकायदेशीर हॉस्पिटल प्रकरणांमध्ये तीन वेगवेगळ्या विभागाकडून तपास सुरू आहे. ज्यात सर्वात मोठा पार्ट आहे तो म्हणजे आरोग्य विभागाचा. यामध्ये सोनोग्राफी मशीन्स तसेच परवाना नसतानाही सुदाम मुंडे यांना हे हॉस्पिटल चालवण्यासाठी कोण कसे मदत करत होते हे तपासण्याची जबाबदारी आहे.


सुदाम मुंडे यांची मुलगी प्रियदर्शनी मुंडे ही डॉक्टर आहे आणि त्यांचेच नाव सुदाम मुंडे यांनी बोर्ड वर टाकले होते. त्यामुळे आरोग्य विभागाने सुदाम मुंडे याच्या मुलीला जवाब घेण्यासाठी बोलावले होते. लेखी जवाब घेतल्यानंतर आता या हॉस्पिटलमध्ये सुदाम मुंडे यांच्या मुलीचा काही सहभाग होता का हे तपासले जात आहे.


अन्न व औषध प्रशासनाकडून सुद्धा या हॉस्पिटल प्रकरणी तपास सुरू केला आहे. गोळ्या औषधाचा पुरवठा करणाऱ्या एका मेडीकल चालकाला नोटीस बजावल्यानंतर इतर आणखी कोणाचा यामध्ये सहभाग आहे, याचा तपास लावला जात आहे. परळी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. आतापर्यंत या प्रकरणांमध्ये एकूण आठ जणांचे जवाब नोंदवण्यात आलेले आहे. मात्र, सुदाम मुंडेला अटक होऊन चार दिवस झाले तरी या प्रकरणी कुणालाही ताब्यात घेतले गेलेले नाही.


Female Feticide | जेलची हवा खाल्ल्यानंतरही सुदाम मुंडेचा काळा धंदा सुरूच, स्त्री भ्रूण हत्येचा पर्दाफाश