वाशिम : स्थानिक आमदाराला समजपत्र पाठवणं पोलिस अधिकाऱ्याला महागात पडलं आहे. अकोल्याचे आमदार गोवर्धन शर्मा यांना समजपत्र पाठवल्याप्रकरणी शिरपूरचे पोलिस निरीक्षक संजय खंदाडे यांची तडकाफडकी वाशिम नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी संतोष पाईकराव हे लोक प्रतिनिधींना उद्धट वागणूक देतात अशी तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधींनी अकोला मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्याकडे केली होती. त्यावर आमदार शर्मा यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्याकडे मोबाईलवर संबंधित कर्मचाऱ्याविरोधात तक्रार केली होती. तसंच आमदार शर्मा यांनी मुख्यमंत्र्याकडेही 20 जुलै 2018 रोजी पत्राद्वारे तक्रार केली होती.
प्रशासनाने पोलीस कर्मचाऱ्यावर काय कारवाई केली? हे आमदार शर्मा यांना कळवणं गरजेचं होतं, मात्र शिरपूर पोलीस निरीक्षकांनी चक्क 20 मे 2019 रोजी गोवर्धन शर्मा यांना समजपत्र पाठवलं. या समजपत्रामध्ये पोलीस कर्मचारी पाईकराव यांच्याविरुद्ध अर्ज प्राप्त झाला असून याबाबतची चौकशी करुन अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठविण्यात आला. असं समजपत्रात म्हटलं होतं. विद्यमान आमदारांना समजपत्राद्वारे कळविणे हे चुकीचे असल्याने आमदार शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिवालयाकडून याची गंभीर दखल घेण्यात आली. याप्रकरणी पोलिस महासंचालकांना मुख्यमंत्री कार्यालयातून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
दरम्यान आमदार शर्मा यांना समजपत्र दिल्याप्रकरणी शिरपूरचे पोलीस निरीक्षक संजय खंदाडे यांची तडकाफडकी वाशिम नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
आमदाराला समजपत्र पाठवणं पोलिस अधिकाऱ्याला महागात पडलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Jun 2019 11:17 PM (IST)
आमदार शर्मा यांना समजपत्र दिल्याप्रकरणी शिरपूरचे पोलीस निरीक्षक संजय खंदाडे यांची तडकाफडकी वाशिम नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -