मुंबई : विधानभवनातील कॅन्टिनमध्ये मटकीच्या उसळीत चिकन सापडल्याने खळबळ उडाली. सहकार विभागातील अधिकारी मनोज लाखे यांनी हा गंभीर बाब निदर्शनास आणून दिली.


संबंधित कंत्राटदार हे निष्काळजीपणे कॅन्टिन चालवत असल्याची तक्रार विधानसभा सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे करण्यात आली आहे. या कॅन्टिनच्या कंत्राटदारांवर सचिवांनी योग्य ती कारवाई करण्याची मागणी मनोज लाखे यांनी केली आहे. या कॅन्टिनमध्ये अधिकारी, नेते, पत्रकार हे नियमितपणे जेवन करत असतात. दरम्यान याप्रकरणी कॅन्टिनकडून लाखे यांची माफी मागण्यात आली आहे.



सध्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने विधानभवनाच्या कॅन्टिनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यात हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली. सहकार विभागातील अधिकारी मनोज लाखे यांनी कॅन्टिनमध्ये मटकीच्या उसळीची थाळी मागवली होती. यावेळी उसळीमध्ये त्यांना चिकनचे तुकडे आढळले.

मनोज लाखे यांनी विधानसभा सचिव जितेंद्र भोळे यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला असून तक्रार केली आहे. कंत्राटदाराचा निष्काळजीपणा यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. मनोज लाखे यांनी याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान कॅन्टिंग पर्यवेक्षक रविंद्र नागे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल मनोज लाखे यांची माफी मागितली. जाणुनबुजून हे घडलेलं नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.