परभणी : पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक असायला हवा तेंव्हाच गुन्हेगारी कमी होऊ शकते मात्र जेंव्हा पोलीसच गुन्हेगारांना मदत करून त्यांच्याकडून आपले उखळ पांढरे करून घेतात तेंव्हा काय गुन्हेगारी कमी होईल आणि काय कायदा व सुव्यवस्था राहील. परभणीत अशाच गुन्हेगारांना मदत करून उखळ पांढरे करणाऱ्या 4 जणांना पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे तर एकाला थेट शासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे.

परभणी पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांचे हे गुन्हेगारांशी संबंध असल्याचे एका गुन्हेगावरील कारवाई दरम्यान पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे. मागील 8 दिवसात अशा 4 पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले असून एका सहायक पोलीस उपनिरीक्षकास थेट शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मात्र पोलीस दलातील अशा गुन्हेगार धार्जिणे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत.

परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या सुरेश डोंगरे, विशाल वाघमारे, उद्धव सातपुते, शरद मुलगीर या 4 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी निलंबित केले आहे तर हनुमंत कच्छवे या सहायक पोलीस उपनिरीक्षकास बडतर्फ केले आहे. हे पाचही जण सतत गुन्हेगारांच्या संपर्कात असायचे ही बाब एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या कारवाई दरम्यान उघडकीस आली आणि पोलीस अधीक्षकांनी या सर्व बाबींची सखोल चौकशी करून कारवाई केली.

अनेक गुन्हे असलेल्या तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्या गुन्हेगारांच्या मोबाईलमध्ये या सर्वांचे मोबाईल नंबर, बँक खाते क्रमांक तसेच वेळोवेळी काही रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग केल्याचे पोलीस अधीक्षकांनी केलेल्या चौकशीतून समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

जिंतुर तालुक्यतातील इटोली येथील सुरेश जैस्वाल, सुनील शितळकर यांना 17 जुनला पोलिसांनी अवैध दारू विक्री प्रकरणात पकडले. या दोघांविरोधात जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र जेंव्हा पोलिसांनी याबाबत चौकशी सुरु केली, त्यावेळी अनेक धक्कदायक बाबी समोर आल्या. सुरेश जैस्वालच्या मोबाईल मधील संभाषण हे स्वतः पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी तपासले. शिवाय मोबाईलमध्ये सहायक पोलीस उपनिरीक्षक हनुमंत कच्छवे यांचे दोन्ही नंबर, उद्धव सातपुते, शरद मुलगीर, विशाल वाघमारे यांचे मोबाईल नंबर सेव्ह केलेले आढळले. शिवाय हनुमंत कच्छवे यांच्या एसबीआय बँकेतील खात्यात या आरोपीकडून 10 हजार रुपये जमा केलेल्या नोंदी देखील काढण्यात आल्या.

या चारही जणांनी जैस्वालवर कारवाई न करण्यासाठी वेळोवेळी पैसे घेतले या सर्व बाबी चोकशी अंती समोर आल्या. त्यामुळे दोषी आढळलेल्या हनुमंत कच्छवे यांच्या कर्तव्यात बेकायदेशीर, बेशिस्त, बेजवाबदार, संशयित, विपर्यस्त, हेकेखोर आणि नैतिक गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी थेट शासकीय सेवेतून बडतर्फ तर विशाल वाघमारे, उद्धव सातपुते, शरद मुलगीर यांना याच प्रकरणात निलंबित करण्याचे आदेश काढलेत. यातील सुरेश डोंगरे यांनी एका वाळू प्रकरणात परस्पर जाऊन तिथं काही गुन्हेगारांसोबत आर्थिक हितसंबंध जोडले, हेही उघड झाल्याने त्यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान गुन्हेगारांशी हितसंबध जोडून पोलीस खात्याची प्रतिमा मालिन करणाऱ्यांविरोधात पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी कारवाईचा धडाका लावला असून ही कारवाई केवळ एवढ्या पुरतीच राहणार नसुन पुढेही अशा प्रकारे गुप्त चौकशी करून कारवाई सुरूच ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आहे.