कोल्हापूर : कोल्हापुरातील यादवनगर परिसरात माजी महापौरांच्या पतीच्या मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा टाकण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षकांसह पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी माजी उपमहापौर शमा मुल्ला यांच्यासह 15 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


VIDEO | कोल्हापुरात माजी उपमहापौर पतीच्या मटका अड्ड्यावर छापा, जमावाचा पोलिसांवर हल्ला | एबीपी माझा



माजी महापौरांच्या पतीच्या मटका अड्ड्यावर पोलीस गेले असता तिथं त्यांना बुकिंगचे रजिस्टर आणि पैसे आढळून आले. अड्ड्यावर पोलिसांची धाड पडल्याचे समजताच माजी उपमहापौर शमा मुल्ला त्यांचे पती समीर मुल्ला यांच्यासह परिसरातील महिला आणि युवकांनी धाड टाकायला आलेल्या प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांना जोरदार धक्काबुक्की केली.

यावेळी प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यावर हल्ला करत एका युवकाने ऐश्वर्या शर्मा यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावून घेत त्यांच्यावर रोखून धरल्याचेही सांगितले जात आहे.

कोल्हापूरच्या यादवनगरमध्ये राष्ट्रवादीच्या माजी उपमहापौर शमा मुल्ला यांचे पती सलीम मुल्ला हे मटक्याच्या व्यवसाय करतात. ज्यावेळी पोलीस शमा मुल्ला यांच्या घरी झाडाझडती करायला गेले त्यावेळी पोलिसांना जोरदार धक्काबुकी झाली. यामध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाला आहे.

या हल्ल्याची माहिती कळताच तात्काळ कोल्हापूर पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आणि पोलिस उपअधीक्षक तिरुपती काकडे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी जाऊन शमा मुल्लांसह 15 जण ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांकडून मुल्लांच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी पोलिसांना मटका, जुगार आणि सावरकरकीची कोही आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली आहेत.

दरम्यान, पोलिसांची जादा कुमक आल्याचे दिसताच समीर मुल्ला आणि काही हल्लेखोर फरार झाले आहेत.  या घटनेतील आणखी काही हल्लेखोर फरार झाले आहेत. जे हल्लेखोर पळून गेले आहेत त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु असल्याचं पोलीस अधीक्षक देशमुख यांनी सांगितलं आहे.