मुंबई : महाराष्ट्रातील औंरगाबादमध्ये मालगाडीच्या धडकेत 16 मजुरांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. रेल्वे रूळावरून पायी जात असताना मालगाडीने या मजुरांना धडक दिली. जालना-औरंगाबाद मार्गावर करमाडजवळ हा अपघात घडला. हे सर्व मजूर जालन्यातून भुसावळला जात असतानाच पहाटे चार वाजता ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती मिळत आहे. सर्व मजूर जालन्यातील एका खाजगी कंपनीत काम करत होते. रात्री जालन्याहून भुसावळला निघाले असून तिथून ते आपल्या गावी छत्तीसगढला जाणार होते. लॉकडाऊनमुळे आपल्या गावी जाण्यासाठी त्यांनी रात्री पायी प्रवास सुरु केला होता. रस्त्यात थकल्यामुळे ते रेल्वे रूळावरच थांबले आणि तिथेच झोपून गेले. गाढ झोप लागल्यामुळे मालगाडी येत असल्याचं त्यांना समजलं नाही. अशातच जालन्याकडून औरंगाबादकडे येणाऱ्या मालगाडीने या मजुरांना धडक दिली. एकूण 21 मजूर असून त्यातील 16 मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे.


दरम्यान, महाराष्ट्रातील या रेल्वे अपघाताबाबत अनेक दिग्गजांनी ट्वीट करत दुःख व्यक्त केलं आहे. तर अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मजुरांना श्रद्धांजली वाहिली आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घटनेवर दु:ख व्यक्त


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत घडलेल्या घडनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान मोदी ट्वीटमध्ये म्हणाले की, 'औरंगाबाद रेल्वे अपघाताच्या वृत्ताने दुखी आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी यासंदर्भात बोलणं झालं आहे. रेल्वे मंत्री या घटनेवर लक्षं देत आहेत. तसेच सर्व आवश्यक मदत पुरवण्यात येणार आहे.'



अपघाताप्रकरणी चौकशीचे आदेश : रेल्वे मंत्री


रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी घडलेल्या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. तसेच अधिक चौकशी करण्याते आदेश दिले आहेत. पियुष गोयल यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये ते म्हणाले की, 'आज सकाळी 5 वाजून 22 मिनिटांनी नांदेड डिव्हिजनमधील बदनापूर आणि करमाड स्टेशन दरम्यान, झोपलेल्या श्रमिकांना मालगाडीने धडक दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. मदत कार्य सुरु असून सदर प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दिवंगत मजुरांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो.'



मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची मदतीची घोषणा


मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सदर प्रकरणी दुःख व्यक्त केलं असून मृत्यूमुखी पडलेल्या मजुरांना मदतीची घोषणा केली आहे. शिवराज सिंह यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली. ते ट्वीटमध्ये म्हणाले की, 'औरंगाबाद रेल्वे अपघातात काळजावर आघात झाला असून तो मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. संवेदनांनी मन भरून जातं... मी रेल्वे मंत्र्यांशी सदर प्रकरणी चर्चा केली आहे. तसेच त्यांच्याकडे सदर प्रकरणाच्या चौकशीची आणि योग्य ती व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.' ते पुढे बोलताना म्हणाले की, 'मध्यप्रदेश सरकारकडून प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात येईल. मी विशेष विमानाने उच्च अधिकाऱ्यांची एक टीम पाठवत आहे.'



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडूनही मदतीची घोषणा


औरंगाबादमध्ये झालेल्या रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मजुरांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मदत जाहीर केली आहे. यासंदर्भात CMO Maharashtra या अकाउंटवरून एक ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये सांगण्यात आलं आहे की, 'मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर(औरंगाबाद) जवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील 16 मजुरांच्या झालेल्या मृत्यूबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 5 लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.' यासंदर्भात आणखी एक ट्वीट करण्यात आलं असून त्यामध्ये लिहिलं आहे की, 'जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. परराज्यातील मजूर आणि कामगारांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडाव्यात यासाठी केंद्राशी सातत्याने बोलत असून लवकरच सर्वांची परतण्याची व्यवस्था होईल. या कामगारांनी धीर सोडू नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.'



मजुरांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी अतिशय व्यथित करणारी : शरद पवार


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबाद रेल्वे अपघातावर दुःख व्यक्त केलं आहे. त्यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं असून ते म्हणाले की, 'औरंगाबादजवळील करमाड रेल्वे दुर्घटनेत मजुरांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी अतिशय व्यथित करणारी आहे. कोरोना महामारीच्या काळातील या अपघाताने केवळ मनाला यातनाच झाल्या नाही तर पायी चालत आपल्या मूळ गावी स्थलांतर करू इच्छिणाऱ्या लोकांचे बिकट प्रश्न ऐरणीवर आले आहेत.'



औरंगाबादची घटना अत्यंत वेदनादायी : बाळासाहेब थोरात


मुहसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही औरंगाबाद प्रकरणी दुःख व्यक्त केलं आहे. यांसदर्भात त्यांनी ट्वीट केलं असून ते म्हणाले की, 'औरंगाबादची घटना अत्यंत वेदनादायी आहे. या संकटकाळात महाराष्ट्र सरकार व काँग्रेस पक्ष मजूर बांधवांसोबत आहोत. मी माझ्या स्थलांतरित बांधवांना विनंती करतो की, त्यांनी आहे तिथेच थांबावे. आपल्या गृहाराज्यात पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे.'



परप्रांतीय कामगारांच्या अपघाती निधनाच्या बातमीने सुन्न झालो : जयंत पाटील

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करत मृत्यू झालेल्या मजुरांना श्रद्धांजली वाहिली आहे. यासंदर्भात ते म्हणाले की, 'औरंगाबाद जालना रेल्वे मार्गावर परप्रांतीय कामगारांच्या अपघाती निधनाच्या बातमीने सुन्न झालो आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. कामगार बांधवांनो सरकार तुम्हाला तुमच्या गावी जाण्यासाठी सर्वोतोपरीने प्रयत्न करत आहे. कृपया आपला जीव धोक्यात घालून प्रवास करून नका.'

परराज्यात जाणारे लोक हे काही पाकिस्तानचे नाहीत : सुरेश धस


औरंगाबादमध्ये 16 पायी जाणाऱ्या लोकांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. ही चीड आणणारी गोष्ट आहे. आपापल्या राज्यांमध्ये जाणारे हे लोक काही पाकिस्तानचे नाहीत. ते आपल्या देशाचे आहेत. मग त्यांना त्यांच्या राज्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सरकार का घेत नाही? असा सवाल भाजपाचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच कोरोनामुळे किती लोक मरतील हा संशोधनाचा विषय असला तरी, राज्यातील धोरणाच्या अभावाचे किती बळी ठरणार आहेत? असा संतप्त सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे.


दुर्दैवी घटनेची जबाबदारी घेऊन पिशुष गोयल यांनी राजीनामा घ्यावा : अर्जुन खोतकर


औरंगाबादमधील दुर्दैवी घटनेसंदर्भात अर्जुन खोतकर यांनी एक ट्वीट केलं आहे. ते ट्वीटमध्ये म्हणाले की, 'भुसावळकडे जाण्यासाठी जालना - संभाजीनगर रेल्वे पटरीने करमाड येथे रेल्वे दुर्घटनेत दुर्देवी अंत १५ मजूरांना भावपूर्ण श्रध्दांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो...' तसेच औरंगबाद मधील दुर्दैवी घटनेची जबाबदारी घेऊन पिशुष गोयल यांनी राजीनामा घ्यावा, मोदींनी त्यांचा राजीनामा घ्यावा. तसेच केंद्राने मयतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाखांची मदत करावी, अशी मागणी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केली आहे.