हिंगोली : हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेले एसआरपीएफचे जवान रुग्णालयामधील वार्डमध्ये असभ्य वर्तन करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे सर्व जवान बेडवर न थांबता वॉर्डमध्ये व रुग्णालयाच्या गच्चीवर फिरत आहेत. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.


कोरोनाबाधित असलेले हे एसआरपीएफचे जवान गच्चीवर फिरत असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. या सर्व प्रकाराबद्दल हिंगोलीचे जिल्हा शल्यचिकित्सक किशोर श्रीनिवास यांनी तशा पद्धतीचे लेखी पत्र राज्य राखीव दलाचे समादेशक मंचक इप्पर यांना देत तक्रार केली आहे.



या पत्रात सांगितलं आहे की, हे जवान उपचार करत असलेल्या नर्सेसना आणि कक्ष सेवकांना तसेच सफाई कामगारांना 'आम्हाला कोरोना झाला आहे. आम्ही तुम्हाला पण संसर्ग केल्याशिवाय सोडणार नाही' असं बोलत आहेत. तसेच 'आम्ही असेच फिरत राहणार. तुम्ही आमचे काहीच करू शकत नाही' असं देखील या जवानांनी म्हटलं असल्याचं पत्रात सांगितलं आहे.

हे जवान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील या पत्रात म्हटलं आहे.

उपचार घेत असलेल्या जवानांची असभ्य वागणूक बघायला मिळत आहे. जवानांच्या अशा वर्तणुकीमुळे रुग्णालयातील कर्मचारी यांच्यावर विपरीत परिणाम होत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, असं या पत्रातून जिल्हा शल्य चिकित्सक यांनी समादेशक यांना म्हटलं आहे. या प्रकरणावर मात्र संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी मात्र बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे.



हिंगोली जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.