सांगली : कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरेपी वरदान ठरत असल्याने लवकरच ब्लड बँकेप्रमाणे प्लाझ्मा बँक तयार केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक रूग्णालयाने वैद्यकीय संरक्षक सामग्री रूग्णालयामध्ये उपलब्ध ठेवणं बंधनकारक केल्याचे स्पष्ट केले आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सांगली जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा सोमवारी वैद्यकिय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19 च्या अनुषंगाने पार पडलेल्या या आढावा बैठकीसाठी सहकार व कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाधता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळाची गरज ओळखून जिल्ह्यातील आरोग्य विषयक सुविधा अद्ययावत करण्यात याव्यात, असे सांगून वैद्यकिय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी, कोरोना व्यतिरीक्त इतर रूग्णांना उपचारात अडचण निर्माण होणार नाही यासाठी प्रशासनाने आवश्यक खबरदारी घ्यावी, अशा सूचना केल्या आहेत. त्याच बरोबर कोरोनाच्या बाबतीत खबरदारी म्हणून आता राज्यात प्रत्येक रूग्णालयाने वैद्यकीय संरक्षक सामग्री रूग्णालयामध्ये उपलब्ध ठेवणे बंधनकारक करण्यात आल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर कोरोना रुग्णांच्यावर प्लाझ्मा थेरपीची उपचार अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुरु करण्यात आले असून ती परिणामकारक ठरली आहे. त्यामुळे लवकरच ब्लड बँकेच्या धर्तीवर प्लाझ्मा बँकही सुरु करण्यात येणार असल्याचे मंत्री देशमुख यांनी सांगितलं आहे.
पाहा व्हिडीओ : ससून रुग्णालयात एका रुग्णावरील प्लाझ्मा थेरपी यशस्वी,प्लाझ्मा थेरपीचा कसा वापर होतो?
काय आहे प्लाझ्मा थेरपी?
- प्लाझ्मा थेरपीत अँटीबॉडीचा वापर केला जातो. त्यामुळे याला प्लाझ्मा थेरपी तसंच अँटीबॉडी थेरपी म्हटलं जातं.
- ज्या व्यक्तीला विषाणूची लागण झालेली असते आणि त्यातून तो पूर्ण बरा होतो अशा व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडी तयार होतात.
- अँटीबॉडीच्या भरवशावरच रुग्ण बरा होतो.
प्लाझ्मा थेरपीचा वापर कसा केला जातो?
- विषाणूची लागण झाल्यानंतर रुग्ण जेव्हा बरा होतो तेव्हा त्याच्या शरीरात अँटीबॉडी तयार झालेल्या असतात.
- बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातून अँटीबॉडी काढून दुसऱ्या आजारी रुग्णाच्या शरीरात टाकल्या जातात.
- अँटीबॉडी शरीरात प्रवेश करताच रुग्णाच्या प्रकृतीवर त्याचा सकारात्मक परिणाम होऊन विषाणूचा प्रभाव कमी होऊ लागतो.
- अँटीबॉडीमुळे रुग्ण बरा होण्याची शक्यता वाढीस लागते.
महत्त्याच्या बातम्या :
BLOG | प्लाझ्मा थेरपी वरदान ठरेल काय?
प्लाझ्मा थेरपी अजून प्रायोगिक पातळीवर; आरोग्य मंत्रालयाची माहिती
Plasma Therapy | पुण्यातील ससून रुग्णालयात पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी