रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर आता 50 ते 52 कर्मचाऱ्यांना क्वॉरन्टाईन करण्याची वेळ कोकण रेल्वेवर आली आहे. रत्नागिरीतील कर्मचारी 9 जून रोजी कामानिमित्त रोहा, कोलाड येथे गेले होते. त्यावेळी त्या ठिकाणी बेलापूरच्या सिग्नल अॅण्ड टेलिकम्युनिकेशन विभागातील कर्मचारीही आला होता. त्यानंतर या कर्मचाऱ्याचा 12 जून रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला. यानंतर मात्र रेल्वेने वेगाने पावलं उचलत या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आल्याची किंवा रोहा, कोलाड या ठिकाणी हजर कामानिमित्त गेलेल्यांची यादी तयार केली आहे. यामध्ये रत्नागिरीतील 52 जण असून या सर्वांना आता क्वॉरन्टाईन करुन ठेवले आहे.


या सगळ्यांना आता रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालय तसंच क्वॉरन्टाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले असून त्यांचे स्वॅब देखील तपासणीकरता घेतले जाणार आहेत. त्यामुळे या साऱ्यांचे स्वॅब टेस्ट रिपोर्ट काय येतात हे देखील पाहावं लागणार आहे. खबरदारी म्हणून योग्य त्या साऱ्या गोष्टी करणार असल्याची प्रतिक्रिया कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.


कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांची वाहतूक सुरुच
अद्याप कोकण रेल्वे मार्गावर सर्वच गाड्या धावत नसल्या तरी काही गाड्या मात्र धावत आहेत. केवळ आरक्षण असलेल्या प्रवाशांनाच यामध्ये प्रवेश दिला जात आहे. शिवाय, मान्सूनही सुरु झाल्याने आता कोकण रेल्वेकडून कोकण रेल्वे मार्गावर गस्त सुरु आहे.


काय आहे जिल्ह्याची स्थिती?
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा आता 431वर पोहोचला आहे. आतापर्यंत 305 जणांनी कोरोनावर मात केली असून 109 जणांवर उपचार सुरु आहेत. तर, 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण हे 70 टक्के झाले आहेत. तर, जिल्ह्यातील कन्टेन्मेन्ट झोनची संख्या आता 130 वरुन 30 झाल्याने जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.