मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभागी केले जात नसल्यामुळे काँग्रेसचे मंत्री नाराज आहेत. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. काँग्रेसच्या मंत्र्यांना सरकारमध्ये दुय्यम स्थान मिळत असून, धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत काँग्रेसच्या मंत्र्यांना सहभाग दिला जात नाही, असा मंत्री अशोक चव्हाणांचा आरोप आहे. राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा एक वर्ग तीनही पक्षात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला आहे. काँग्रेस मंत्री अशोक चव्हाण यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत बोलताना हे वक्तव्य केलं आहे.


महाविकास आघाडीतील तीन पक्षांपैकी एक असलेल्या काँग्रेस पक्षाने आपली नाराजी आता उघडपणे मांडली आहे. काँग्रेसचा आरोप आहे की, सरकारच्या धोरणात्मक निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत त्यांना सहभागी केलं जात नाही. काँग्रेसच्या नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे राज्यातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांसोबत सोमवारी बैठक घेणार होते. परंतु, उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना पितृशोक झाल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली. आता ही बैठक आज पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण बैठक घेणार आहेत.


पाहा व्हिडीओ : अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार



काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी वृत्तपत्राला देण्यात आलेल्या मुलाखती दरम्यान, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आपली नाराजी उघडपणे मांडली होती. महाविकास आघाडीत काँग्रेसच्या मंत्र्यांना सरकारमध्ये दुय्यम स्थान मिळत असून, अनेक धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत काँग्रेसच्या मंत्र्यांना सहभाग दिला जात नाही, असा मंत्री अशोक चव्हाणांनी आरोप केला होता. तसेच तीनही पक्षांना बरोबरीचं स्थान मिळणं गरजेचं आहे. कारण सरकार तीनही पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेलं आहे, असं मंत्री अशोक चव्हाणांचं म्हणणं आहे.


चव्हाणांनी मुलाखतीत सांगितल्यानुसार, सरकारमध्ये महत्त्व मिळत नसल्याची अनेक काँग्रेस नेत्यांचीही तक्रार आहे. विकास कामांसाठी वाटण्यात येणाऱ्या निधीबाबतही तीन पक्षांमध्ये असमानता दिसून येत आहे. प्रत्येक आमदाराला आपल्या क्षेत्राचा विकास करायचा आहे. अशोक चव्हाण यांनी सांगितलं की, 'जरी काँग्रेसचा हेतू कोणत्याही परिस्थिती भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा असला, तरी या गोष्टीला काँग्रेसची कमजोरी समजू नका.'


दरम्यान, काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेले बाळासाहेब थोरात यांनीही आरोप केला होता की, सराकारमध्ये त्यांना डावलण्यात येत आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात राहुल गांधी यांनीही एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं होतं की, काँग्रेसने जरी महाराष्ट्रात सराकार स्थापन करण्यासाठी समर्थन दिलं असलं, तरी सरकारमध्ये कोणताही निर्णय घेऊ शकत नाही.'


महत्त्वाच्या बातम्या : 


आम्ही भक्कमपणे आघाडीसोबत, आमच्या भेटीनंतर 'सामना'ने पुन्हा अग्रलेख लिहावा : बाळासाहेब थोरात