मुंबई/शिर्डी : आता देशभरातल्या भाविकांना साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी काही तासांत शिर्डी गाठणं शक्य होणार आहे. शिर्डी विमानतळावर चाचणीसाठी मुंबईहून उड्डाण घेतेलेल्या विमानतळाचं आज यशस्वी लँडिंग झालं.
दुपारी चारच्या सुमारास मुंबईच्या विमानतळाहून विमानाने शिर्डीसाठी उड्डाण घेतलं. साधारण चाळीस मिनिटांच्या कालावधीत विमान शिर्डीत दाखल झालं. विमानात अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदेंसह तज्ज्ञांच पथक होतं.
शिर्डी विमानतळाच्या धावपट्टीची पाहणी केल्यानंतर 1 ऑक्टोबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विमानतळाचं लोकार्पण करण्यात येईल. शिर्डीहून मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि भोपाळ या शहरांसाठी रोज सहा विमानांच्या उड्डाणाला परवानगी मिळाली आहे. मात्र प्रवाशांच्या प्रतिसादावर विमानसेवेचं भविष्य अवलंबून असेल.
साईबाबा समाधी महोत्सवाचं उद्घाटन करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद 1 ऑक्टोबर रोजी शिर्डीला येणार आहेत. याच वेळी शिर्डी विमानतळाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करून प्रवासी वाहतूक सुरू करण्याची जोरदार तयारी राज्य सरकारने सुरु केली आहे.
साईबाबा समाधी महोत्सवाचं औचित्य साधून भाविकांना विमान सेवा उपलब्ध करून देण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे. प्रारंभी मुंबई, दिल्ली, हैदराबाद, भोपाळ येथून शिर्डीसाठी रोज 6 उड्डाणांची मंजुरी असली तरी सुरुवातीला या ठिकाणांवरून एक-एक उड्डाण सुरू केलं जाईल. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून उड्डाणांची संख्या वाढवली जाईल.