औरंगाबाद : रस्त्यावर स्वस्तात बिर्याणी खात असाल तर सावधान! कारण तुम्ही खात असलेली बिर्याणी ही चिकन किंवा मटणची नसून ती कुत्र्याची असू शकते. हे ऐकून धक्का बसेल. मात्र हे खरं आहे. औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी कुत्र्यांचे कापलेले शीर सापडत आहेत आणि हे बिर्याणीत कुत्र्यांचं मांस वापरल्यामुळे होत असल्याचं वास्तव अॅनिमल वेलफेअर मंडळाच्या सदस्यांनी समोर आणलं आहे.


औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी नाल्यात किंवा कचऱ्यात कुत्र्यांचे कापलेले शीर आढळून येत आहेत. मात्र त्याचे धड आढळून येत नाही. रस्त्यावर मिळणाऱ्या स्वस्त बिर्याणीत कुत्र्यांचं मांस सर्रास वापरलं जात असल्याने हे प्रकार होत असल्यायचं धक्कादायक वास्तव अधिकाऱ्यांनी समोर आणलं. स्वस्तात बिर्याणी विकत असताना असे प्रकार होत आहेत. यात कुत्र्यांसोबत मांजरीचंही मांस वापरलं जात असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी  केला आहे.

कुत्र्याचं मांस आरोग्यासाठी हानिकारक

बिर्याणीत जर कुत्र्याचं मांस मिश्रण केलेलं असेल तर हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे सर्वसामान्यांचा जीव जाण्याची देखील शक्यता असल्याचं अॅनिमल वेलफेअर मंडळाच्या सदस्यांचं मत आहे.

महापालिका शहरात तपासणी करणार

औरंगाबादेत मुकुंदवाडी, चिकलठाणा आणि पाडेगाव या भागांमध्ये कुत्र्यांचे कापलेले शीर आढळून आले. त्यामुळे स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी समितीसमोर हा प्रश्न उपस्थित केला. समितीच्या सदस्यांनी यातील वास्तव सांगितल्यावर आता महापालिका रस्त्यांवरील सर्व बिर्याणीच्या गाड्यांची तपासणी करणार आहे.

अॅनिमल वेलफेअर मंडळाचे सदस्य औरंगाबादेत पाहणीसाठी आले होते. त्यावेळी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं. त्यामुळे तुम्ही कुठेही रस्त्यावरील गाड्यांवर बिर्याणी खात असाल तर ती चिकन किंवा मटणची असल्याची खात्री करा आणि मगच खा.