पुणे : शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे पिंपरी चिंचवडची वाटचाल सध्या बिहारच्या दिशेने सुरु आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण शहरात गुंडांचा सशस्त्र हैदोस काही केल्या थांबतच नाही. आता तर केवळ एक हजार रुपयांसाठी गुंडाने दुकान मालकावरच बंदूक रोखल्याची धक्कादायक घटना पिंपरीत घडली आहे. ग्राहकांदेखतच हा संतापजनक प्रकार सुरू होता. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.


अन्य एका महिलेसोबत देखील त्या गुंडाने असाच प्रताप केल्याचं समोर आलं आहे. हफ्ते वसुली अर्थात खंडणीखोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत ही कैद झालाय. सराईत गुन्हेगार देवा जमादारने 10 जानेवारीला गहूंजे गाव या ठिकाणी हा प्रताप केला. रात्री पावणे दहा वाजता तो किराणा मालाच्या दुकानात घुसला. ग्राहक उपस्थित असतानाच कंबरेची बंदूक बाहेर काढली, ती लोड केली आणि दुकान मालकाला जीवे मारण्याची धमकी दिली. हे पाहून ग्राहकांनी दुकानातून काढता पाय घेतला. 


अवघ्या एक हजार रुपयांसाठी त्याने हे कृत्य केलं. बिहार स्टाईलने त्याने धाडस केल्याने सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर त्याने आणखी एका महिला व्यावसायिकेला पैशासाठी धमकावले. याप्रकरणी तळेगाव दाभाडे आणि देहू रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


देवा जमादारवर या पूर्वीच दरोडा, चोरी आणि शस्त्र बाळगण्याचे गुन्हे दाखल आहेत. गेल्या महिन्यात सार्वजनिक ठिकाणी गोळीबाराच्या दोन घटना घडल्या होत्या. दोन्ही घटनांचे फिल्मी स्टाईल सीसीटीव्ही दृश्य ही समोर आली होती. त्यात दोघांना जीव गमवावा लागला. त्यानंतर गुन्हेगारांनी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या नेतृत्वातील पथकावर गोळीबार करण्याचं धाडस केलं होतं. आता तर अवघ्या एक हजार रुपयांच्या हफ्तेखोरीसाठी या गुंडाने बंदुकच रोखली. आयर्नमॅन पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची गुन्हेगारांवरील वचक सुटल्याने शहर भयभीत झालं असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच पिंपरी चिंचवडची वाटचाल बिहारच्या दिशेने सुरु आहे अशीच चर्चा शहरभर रंगत आहे.


महत्त्वाच्या बातम्या :