पिंपरी चिंचवड : मुख्यमंत्र्यानंतर मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी सोमवारी (11 फेब्रुवारी) बैलगाडीचं सारथ्य केलं. पिंपरी चिंचवड इथल्या इंद्रायणीथडी जत्रेत अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी बैलगाडीतूनच त्या मंचावर आल्या. त्यावेळी बैलगाडीचं सारथ्य फडणवीस यांनी केलं.


बैलगाडीतून एन्ट्री ही सर्वात आनंददायी असल्याची प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली. लहानपणापासून बैलगाडीत बसण्याची हौस होती, ती आज पूर्ण झाली. पण शेतात जाऊन बैलगाडीत बसायची इच्छा अजूनही अपूर्ण असल्याचं त्या म्हणाल्या. तसंच "माझी ही इच्छा तुम्ही पूर्ण कराल, अशी अपेक्षा व्यक्त करते," असंही त्या आयोजकांना म्हणाल्या.

याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही 12 ऑगस्ट 2017 रोजी भोसरीतच बैलगाडीचं सारथ्य केलं होतं आणि आता त्यांच्या पत्नीनेही इथेच बैलगाडी हाकली. बैलगाडीचं सारथ्य केल्यानंतर अमृता फडणवीस यांनी पॅरालिम्पिकचे जवान आणि महिलांसोबत रॅम्पवॉकही केला.