पालघर : जिल्ह्यात पिकअप वाहनांची चोरी करणाऱ्या सराईत टोळीच्या बोईसरच्या स्थानिक गुन्हे विभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 64 गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून 27 पिकअप वाहने, चार वाहनांचे स्पेअर पार्ट जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक गौरव सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या काही दिवसांपासून या टोळीने जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता.


मुकेश एकनाथ हांडवा(वय 25, रा. वसुरी, ता. वाडा), अविनाश सदु भोईर(वय 20, रा. वसूरी, ता. वाडा), सलमान इक्बाल शेख(वय 25, रा. तेलीवाडा, तारापूर), अमिरहुसेन गुलामहुसेन शेख(वय 26, रा. शेलारागाव, भिवंडी), शहीद हैदरअली शेख(वय 42, वसई, नरेश जयराम भोईर(वय 27, वसुरी, ता. वाडा)अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पालघर जिल्ह्यात चार चाकी वाहनांच्या चोरीस आळा घालण्यासाठी तसेच चोरीस गेलेल्या चार चाकी वाहनांची माहिती काढून वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेण्याबाबत गौरव सिंग यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रविंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्ह्यातून चोरीस गेलेल्या महिंद्रा पिकअप व महिंद्रा मॅक्स या गाड्यांची माहिती संकलित करून त्यांचे इंजिन नंबर, चासी नंबर, रजिस्ट्रेशन नंबर तसेच स्पेअर पार्ट बदली करून विक्री करणारे 7 आरोपी निष्पन्न करून त्यांचा शोध घेवून त्यांना अटक केली आहे.

पोलिस तपासात 64 गुन्हे उघडकीस -

अटक केलेल्या आरोपी दिवसा पिकअप वाहनांच्या पार्कींगची रेकी करत आणि रात्रीच्या वेळी बनावट चावीने पिकअप वाहने चोरी करत असत. ही चोरीची वाहने भिवंडी येथील गॅरेजवर आणून मूळ वाहनांची नंबर प्लेट काढून टाकून त्याचा इंजिन नंबर आणि चासी नंबर ग्रायंडर मारून नष्ट करायचे. त्यानंतर मूळ वाहनांची बॉडी आणि इतर भागात बदल करुन 2 ते 3 लाख रुपयांत वाहनांची विक्री करत होते. तर, वाहनाचे काही सुटे पार्ट्स करुन त्याची जुन्या बाजारात विक्री करत. तसेच रोडलगत पार्कींग केलेल्या पिकअप वाहनांचे रात्रीच्या वेळी स्पेअर पार्ट्स आणि मोकाट जनावरे चोरी करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, याप्रकरणातील मुख्य सूत्रधार फरार आहे. त्याचे नाव आणि पत्ता मिळाला असून लवकरच त्यास अटक करण्यात येणार आहे.

मुंबईतील प्रसिद्ध एमएम मिठाईवाला यांच्या चालकाला 12 लाखांच्या चोरीप्रकरणी अटक

पोलिसांनी आरोपींकडून 51 पिकअप वाहने, ठाणे आयुक्तालयामधील कापूरबावडी येथील 1 पिकअप वाहन, गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्यातून 2 पिकअप वाहने, दादरानगर हवेली येथून 1 वाहन असे 55 पिकअप वाहनांची 5 ठिकाणाहून पार्कींग मधली चारचाकी वाहनांचे स्पेअर पार्ट्स तसेच 4 ठिकाणाहून मोकाट जनावरांची चोरी असे एकूण 64 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यापैकी 27 पिकअप वाहने आरोपींकडून जप्त करण्यात आली आहेत. त्यामध्ये 19 महिंद्रा पिकअप, 6 महिंद्रा मॅक्स, 2 पिकअप टोईंग व्हॅनचा समावेश आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक रविंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड, पोलीस उप निरीक्षक अभिजित टेलर, सहा. फौजदार विनायक ताम्हाणे, सुनिल नलावडे, दिपक राऊत, संदीप सुर्यवंशी, नरेंद्र पाटील, निरज शुक्ता, नरेश जणाठे यांनी केली. याप्रकरणी आरोपींना 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींकडून आणखी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे सिंग यांनी सांगितली.

Robbers Gang | दिल्लीतून कार चोरी, पिंपरीत विक्री, कार चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश | पिंपरी-चिंचवड