मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध एमएम मिठाईवाला यांच्या चालकाला कांदिवली पोलिसांनी 12 लाख रुपयांच्या चोरीच्या आरोपात अटक केली आहे. प्रदीप संनगले (वय 30 वर्ष) असं आरोपी चालकाचं नाव आहे. तो दहा वर्षांपासून एमएम मिठाईवाला यांचा चालक म्हणून काम करतो. पोलिसांच्या माहितीनुसार, एमएम मिठाईवाल्याचं दररोजची कमाई दुकानाच कॅशिअर आणि चालकाच्या हाती मालकाकडे पोहोचत असे.


एमएम मिठाईवाला यांचा स्वत:पेक्षाही जास्त विश्वास या चालकावर होता. एमएम मिठाईवाला आपल्या दुकानात दररोज होणारी कमाई या चालकाच्या हातूनच स्वीकारत असत. मात्र हे पैसे पाहून चालकाची नियत बदलली. त्याने 2 जानेवारीला आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने हे पैसे चोरण्याचा प्लॅन बनवला.

पोलिसांच्या माहितीनुसार, 2 जानेवारी रोजी चालक दुकानातून 12 लाख रुपयांची रोकड मालकाला देण्यासाठी मालाडमधून कारने निघाला. परंतु पैसे मालकाला न देता, त्याने दहिसर चेक नाक्याजवळ आपल्या दोन साथीदारांना बोलावून त्यांच्याकडे दिले. त्यानंतर पान खाण्यासाठी उतरलो असताना पैसे चोरीला गेल्याचं चालकाने मालकाला सांगितलं.

यानंतर एमएम मिठाईवालाचे मालक चालकाला घेऊन कांदिवली पोलिसात पोहोचले आणि चोरीची तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी चालकाची चौकशी केली. तपासादरम्यान चालकाच्या मोबाईल फोनमध्ये दोन डायल नंबर सापडले. त्यावर कॉल करुन पोलिसांनी आपण चालक असल्याचं भासवत त्याच्या साथीदारांना पैशांबाबत विचारणा केली आणि त्यांना दहिसर चेकनाक्याजवळ बोलावलं.

यानंतर कांदिवली पोलिस दहिसर चेकनाक्याजवळ पोहोचले. यावेळी तिथे आलेल्या चालकाच्या दोन साथीदारांना 12 लाख रुपयांसह अटक केली. प्रदीप संनगले, (वय 30 वर्ष), प्रमोद बागवे (वय 35 वर्ष) आणि सुमीत दिघे (वय 41 वर्ष) अशी पकडलेल्या आरोपींची नावं आहेत.