मुंबई : सिंधुदुर्गात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना 7 ऑगस्टनंतर प्रवेश दिला जाणार नाही, असा एक कागद सगळीकडे व्हायरल झाला होता. तो कागद जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेली चर्चा होती. परंतु असा कोणताही निर्णय झाला नसल्याचं आज पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. कोरोनाच्या संकंटात कोकणात गणेशोत्सव कसा साजरा झाला पाहिजे. 14 दिवसांचा क्वॉरंटाईन टाईम पकडला तर चाकरमानी कधी आले पाहिजे, या दृष्टीने अधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली होती. या बैठकतली चर्चा ज्या प्रशासकीय भाषेत मिनिट्स बोलले जातात तो हा कागद व्हायरल झाला होता आणि एकच गोंधळ उडाला होता.
त्यामुळे आज सिंधुदुर्ग पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी स्थानिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवसांऐवजी सात दिवस क्वॉरंटाईन ठेवणे, कोकणात येताना-जाताना टोल माफ सुविधा देणे, त्यांच्या पासेसची व्यवस्था आणि प्रवासाचे नियोजन, तसेच त्यांची कोविड-19 ची तपासणी करणे आणि त्याचा खर्च शासनाने करावा, अशा विविध विषयांवर सविस्तर बैठकीत चर्चा करण्यात आली. आज झालेल्या शांतता समितीची बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही.
काल काय घडलं होतं?
22 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. त्याअनुशंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात चाकरमान्यांना प्रवेश देण्याबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. असा कागद प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यात सर्वात मुख्य निर्णय म्हणजे इतर जिल्ह्यांतून सिंधुदुर्गात येणाऱ्या गणेशभक्तांना 7 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंतच प्रवेश देण्यात येणार आहे, अशी तयारी दर्शविली होती. जिल्ह्यात येण्यासाठी ई-पास आवश्यक असून ई-पास नसल्यास वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे कोकणवासियांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकराच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या.
नारायण राणे आंदोलनाच्या तयारीत
सरकार गणेशोत्सव काळात ७ ऑगस्टनंतर कोकणात चाकरमान्यांना बंदी घालणार असेल तर आपण आंदोलन करू, असा इशारा राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी दिला होता. कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणीही रोखू शकत नाही. गणेशोत्सव हा चाकरमान्यांशिवाय साजरा होऊ शकत नाही, अशी भूमिका खासदार नारायण राणे यांनी मांडली होती. महाविकास आघाडीमध्ये सध्या काय सुरु आहे हे कळत नाही, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं जात नाही, अधिकाऱ्याचं ऐकून निर्णय घेतले जातात, अशी टीका करायला नारायण राणे विसरले नाहीत.
इतर बातम्या- महाराष्ट्रात रेमंडेसिवीर आणि टोसीलिझम औषधांचा तुटवडा
- राज्य सरकारच्या मदतीने खाजगी हॉस्पिटल कोविड रुग्णांची लूट करतायेत; किरीट सोमैया यांचा आरोप
- पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये पुन्हा लॉकडाऊन, अजित पवार यांचे आदेश