धुळे : टिकटॉकवर बंदी असताना बुधवारी धुळे शहरातील भीमनगर भागात राहणाऱ्या एका युवकानं टिकटॉकवर भाईगिरी करत असल्याचा व्हिडीओ अपलोड केला. मात्र, हा व्हिडीओ त्याला चांगलाच महागात पडलाय. पोलिसांनी याप्रकरणी त्याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना हत्यारासह ताब्यात घेतलं. पोलिसांनी कारवाई करताच टिकटॉकवर भाईगिरी करणाऱ्या या युवकानं पोलीस विभागाची, नागरिकांची माफी मागितली. तसा व्हिडीओ देखील वायरल झाला आहे.


विशेष म्हणजे टिकटॉकवर अपलोड झालेल्या या व्हिडिओत या टिकटॉक खलनायकाच्या हातात एक कट्टा पोलिसांनी बघितला. मात्र, प्रत्यक्ष कारवाई वेळी दोन गावठी बनावटीचे पिस्तूल (कट्टे), 3 जिवंत काडतूस असा एकूण 71 हजार 500 रुपयांच्या मुद्देमालसह पडद्यामागील अन्य दोन खलनायकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं.


हिंदी चित्रपटातील खलनायकाप्रमाणे शेरेबाजी 


टिकटॉकवर हातात पिस्तूल घेऊन एखाद्या हिंदी चित्रपटातील खलनायकाप्रमाणे शेरेबाजी करणाऱ्या एका युवकाचा व्हिडीओ वायरल झाला होता. हा व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर देखील वायरल झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून धुळे शहरातील साक्री रोड परिसरात राहणारा दीपक सुरेश शिरसाठ या युवकासह अन्य दोघांना ताब्यात घेत दोन गावठी बनावटीचे पिस्तूल (कट्टे), 3 जिवंत काडतूस असा एकूण 71 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. साक्री रोड भागातील भीम नगर परिसरात दीपक सुरेश शिरसाठ हा गावठी कट्टा जवळ बाळगून फिरत असताना भीमनगर परिसरातून पोलिसांनी त्याला अटक केली. विशेष म्हणजे केंद्र सरकारनं टिकटॉक वर बंदी घातलेली असताना टिकटॉकवर हा व्हिडिओ अपलोड कसा झाला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


टिकटॉक बंद झालं म्हणून काळजी करुन नका.. हा आहे बेस्ट पर्याय


पडद्याच्या मागे आणखी दोन खलनायक 


दीपक शिरसाठने हा कट्टा धुळे शहरातील पद्मनाभनगर परिसरात राहणाऱ्या पंकज परशराम जिसेजा याने दिल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी पंकज जिसेजा याचा शोध घेऊन त्याला पोलीस खाक्या दाखवताच त्यानं कबुली देत आणखी एक गावठी कट्टा धुळे तालुक्यातील कुंडाणे येथील अभय दिलीप अमृतसागर याला दिल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी अभय अमृतसागरला देखील ताब्यात घेतलंय. टिकटॉकच्या पडद्यावर हातात बंदूक घेत भाईगिरी करणारा होता एक. मात्र, पडद्याच्या मागे आणखी दोन खलनायक असल्याचं पोलिसांनी केलेल्या कारवाईतून स्पष्ट झालं.


पोलिसांनी हिसका दाखवताच सोशल मीडियावर हातात हत्यार घेऊन दहशत, भाईगिरी करणाऱ्या, शेरेबाजी करणाऱ्या दीपक शिरसाठने घडल्या प्रकाराबाबत माफी मागत पोलिसांप्रती आपल्याला आदर असल्याचं म्हटलंय. कोणीही अशी चूक करू नका असं देखील म्हटलंय. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकानं ही कारवाई केलीय. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या दीपकचा सहकारी पंकज जिसेजा,अभय अमृतसागर या दोघांविरोधात यापूर्वी पोलिसात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.


India China Dispute | TikTok चा खटला लढवण्यास मुकुल रोहतगींपाठोपाठ अभिषेक मनुसिंघवींचा नकार