रत्नागिरी : गणेशोत्सव! कोकणातील सर्वात मोठा आणि कोकणी जनतेचा जीवाभावाचा सण. जगाच्या कानाकोपऱ्यात असलेला माणूस गणेशोत्सवासाठी आपल्या कोकणातील मुळगावी येणार हे ठरलेलंच! पण, यंदा मात्र कोरोना चाकरमान्यांच्या वाटेत विघ्न बनून उभा आहे. त्यामुळे कोकणात विघ्नहर्त्याचे स्वागत करायला येणाऱ्या चाकरमान्यांपुढे समस्यांचा डोंगर उभा आहे. गावात येणे झाल्यास 14 दिवस आधी या असा निर्णय आता बहुतांश ग्रामपंचायती करताना दिसत आहेत. त्यामुळे नोकरी-धंदा सांभाळून ही गोष्ट साधायची कशी? असा यक्ष प्रश्न सध्या या चाकरमान्यांपुढे आवासून उभा आहे. त्यामध्ये काही गावांनी सामंजस्य भूमिका घेत 7 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी करता येईल का? याचा विचार सुरू केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे या गावानं तर चाकरमान्यांनो 7 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करा आणि खुशाल बाप्पाचं स्वागत करा असा निर्णय घेतला. पण, पुढच्या दोनच दिवसात कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निर्णयानं चाकरमान्यांच्या उरल्यासुरल्या आशेवर देखील पाणी फिरलं. कारण, खारेपाटण या गावच्या बाजारपेठेत प्रवेश करायचा असेल तर 14 दिवसांचा क्वारंटाऊन कालावधी पूर्ण कराच. त्याशिवाय या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय, चाकरमान्यांना या ठिकाणी यायचं झाल्यास ग्रामपंचायतीकडून क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्याचं पत्र किंवा दाखल, आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे आता चाकरमान्यांना गावी आल्यानंतर क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणे क्रमप्राप्त असणार आहे.



काय आहे खारेपाटण बाजारपेठेचं महत्त्व?


मुंबईकडून जाताना रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग बाजारपेठेत प्रवेश करताना मुंबई - गोव्याला लागून हे गाव आहे. याच गावात ही बाजारपेठ आहे. तसं पाहायाला गेले तर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील किमान 15 ते 20 गावं, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, वैभववाडी, देवगड या तालुक्यातील काही गावांचे नागरिक देखील या ठिकाणी बाजारासाठी येतात. ही बाजारपेठ या गावांना जवळ आणि तुलनेनं मोठी पडत असल्याने या बाजारपेठेचं महत्त्व आहे. बाजारपेठेत साणसुदीच्या कालावधीत लाखो- करोडो रूपयांची उलाढाल होते. शिवाय, अगदी इतिहासात डोकावून पाहायाला गेल्यास देखील या बाजारपेठेचं महत्त्व अधोरिखित होते. शिवाजी महाराजांच्या काळात देखील खारेपाटणचं महत्व होते. गावाला लागून खाडी असल्यानं किमान या साऱ्या गोष्टींचा अंदाज बांधता येऊ शकतो.


आजुबाजुच्या गावांमधून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी काय नियम?


इतर दिवशी देखील या बाजारपेठेत गर्दी आणि वर्दळ दिसून येते. सणासुदीच्या कालावधीत ती आणखीन वाढते. कोरोना रूग्णांची संख्या सध्या कोकणात देखील वाढताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरता खारेपाटण या ठिकाणी किमान राजापूर, वैभववाडी, कणकवली आणि देवगड तालुक्यांमधील 25 ते 30 गावच्या सरपंचांची सभा झाली. यावेळी कोरोनाची सारी परिस्थिती पाहता क्वारंटाईन पूर्ण केलेल्या नागरिक किंवा चाकरमान्यांनाच या बाजारपेठेत प्रवेश दिला जाईन असा एकमुखी निर्णय झाला. बैठकीला गैरहजर असलेल्या काही सरपंचांनी देखील हा निर्णय मान्य असल्याचे कळवले. खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत यांनी एबीपी माझाला तशी माहिती दिली. दरम्यान, केवळ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हाच यामागील उद्देश असल्याचे राऊत यांनी माझाकडे बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे गावाचा क्वारंटाईन कालावधी कितीही असला तरी खारेपाटणच्या बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक चाकरमान्याला हा 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणे गरजेचे असणार आहे. याबाबतची सारी जबाबदारी ही आता संबंधित गावच्या सरपंचांवर आली आहे. ज्या उंबर्डे गावानं 7 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी केला होता, त्या गावचे सरपंच देखील यावेळी हजर होते. त्यांनी हा निर्णय मान्य असल्याचे सांगितले अशी माहिती देखील राऊत यांनी 'माझा'ला दिली. त्यामुळे खारेपाटणच्या बाजारपेठेत प्रवेश करायचा झाल्यास सर्वांना 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणे गरजेचे असणार आहे. शिवाय, तसे पत्र देखील लागणार आहे. केवळ मुंबईच नाही तर इतर जिल्ह्यातून येणाऱ्यांना देखील हा नियम लागू असणार आहे.


सध्या कोकणात काय आहेत क्वारंटाईनचे नियम


शासनाकडून क्वारंटाईनच्या नियमाबाबत काहीही ठरलेले नाही. केवळ निर्णय होईल. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे. ते लवकरच निर्णय घेतील अशी उत्तरं राज्यकर्ते किंवा कोकणातील मंत्री आणि नेते देत आहेत. पण, महिन्यापेक्षा देखील कमी कालावधी हा गणपतीकरता राहिलेला असताना याबाबत निर्णय का होऊ शकला नाही? असा सवाल सध्या विचारला जात आहे. दरम्यान, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकांला 14 दिवसांचा क्वारंटाईन कालवधी बंधनकारक करण्यात आलेला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील अनेक ग्रामपंचायतींनी तशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. तशी माहिती देखील अनेक ग्रामपंचायती या चाकरमान्यांपर्यंत पोहोचवत आहेत.