मुंबई : दूध उत्पादकांना रास्त भाव देण्यात महाआघाडी सरकारला आलेले अपयश झाकण्यासाठी काही मंडळी केंद्र सरकारने दूध पावडर आयात केली असल्याची खोटी माहिती पसरवत आहेत, असा आरोप भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे. दूध पावडरच्या आयातीबद्दल जाणीवपूर्वक संभ्रम पसरविण्यात येत आहे. दूध उत्पादकांनी यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही डॉ. बोंडे यांनी केले आहे.


प्रसिद्धी पत्रकात डॉ. बोंडे यांनी म्हटले आहे की , अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अलीकडेच भारतीय जनता पार्टीने राज्यभरात आंदोलन केले. महाआघाडी सरकारला समर्थन देणारे राजू शेट्टी यांनीही 21 ऑगस्टला दूध भावाकरिता आंदोलन केले. शेट्टी यांनी केंद्र सरकारने दूध पावडर आयात केल्याने दूध उत्पादकांना भाव वाढवून मिळत नसल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात केंद्र सरकारने दूध पावडर आयात केलीच नसल्याची माहिती मिळाली आहे. वाणिज्य मंत्रालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार 23 जून रोजी केंद्र सरकारच्या अर्थ विभागाद्वारे सूचनेमध्ये गॅट करारान्वये भारताला आयात करावयाच्या वस्तूंबद्दल माहिती दिलेली आहे. जागतिक व्यापार संघटनेची ही बंधने मनमोहन सिंह यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात मान्य केलेली आहेत.


गॅट कराराप्रमाणे भारत सरकारला 2014-2015 ते 2019-2020 या कार्यकाळात 5 लाख मेट्रिक टन मका, 10 हजार मेट्रिक टन दूध व मलाई पावडर रुपात, सूर्यफुल तेल दिड लाख मेट्रिक टन, रिफाइन्ड सरकी, मोहरी तेल दीड लाख मेट्रिक टन घेणे आवश्यक आहे. या संदर्भातील सूचना काढल्यानंतर मका, दूध आयात करण्यात आले, अशी अफवा उठविण्यात आली. नाफेड व अन्य एका संस्थेला 5 लाख मेट्रिक टन मका आयात परवाना देण्यात आला होता. या परवान्याची मुदत फेब्रुवारी 2021 पर्यंत असली तरी अद्याप पर्यंत या संस्थांनी मका आयात केलेला नाही. या संस्थांनी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार भारतामधूनच शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्याचे नियोजन व कारवाई केली आहे. मका खरेदीला 31 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.


गॅट करारा नुसार 10 हजार मेट्रिक टन दूध पावडर आयात करण्याचे बंधनकारक असले तरी कोणत्याही आयातदाराचे इच्छापत्र दिलेले नाही व कोणालाही आयातीचा परवाना देण्यात आलेला नाही. त्यामुळे दूध पावडर आयात करण्यात आली हा दावा संपूर्णत: निराधार व फसवा आहे. या प्रमाणेच मोहरी ,सरकी व सूर्यफूल तेलाच्या आयातीसाठी आयातदार संस्थेकडून मागणी करण्यात आलेली नाही तसेच या तेलाच्या आयातीचा कोणालाही परवाना दिला गेलेला नाही.


Milk Rates | वाढीव दूध दर आणि अनुदानासाठी राज्यभर आंदोलन,दूध दराचा नेमका प्रश्न काय आहे? स्पेशल रिपोर्ट