Pasha Patel Got Mr. Govidbhai Memorial Award: कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल (Pasha Patel) यांनी तब्बल दहा वर्ष अथक परिश्रम घेवून देशातील तेलबिया उत्पादन वाढीसह शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी विशेष कार्य केलं आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत द सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया मुंबई, जीजीएन रिसर्च राजकोट/इंदूरच्या सहकार्यानं यंदाच्या 'श्री गोविंदभाई मेमोरियल अवॉर्ड्स'करता निवड करण्यात आली आहे.


28 सप्टेंबर रोजी श्री. गोविंदभाई मेमोरियल अवॉर्ड द सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया मुंबईच्या 60 व्या वर्षाच्या समारंभात सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. मुंबईत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. या प्रतिष्ठित पुरस्काराची स्थापना तीन महत्त्वाच्या श्रेणींमध्ये उल्लेखनीय योगदानासाठी करण्यात आली आहे. त्या तीन श्रेण्या खालीलप्रमाणे... 


1. कमोडिटी विश्लेषक/ट्रेडर
2. इलेक्ट्रॉनिक प्रेस मीडिया
3. शेतकरी/एफपीओ/सेवा


मानचिन्ह रोख  50,000 रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तेलबिया उत्पादक शेतकर्‍यांना पाठिंबा देण्याच्या तुमच्या अतुलनीय समर्पण आणि तळमळ यामुळे पाशा पटेलांची 'श्री गोविंदभाई मेमोरियल अवॉर्ड 2022-23' करता निवड केल्याचे द सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया मुंबईचे अध्यक्ष अजय झुनझुनवाला यांनी सांगितलं आहे. या पुरस्कार सोहळ्याकरता डॉ. भागवत कराड, केंद्रीय वित्त राज्यमंत्री, भारत सरकार यांच्यासह कृषी मंत्रालयाचे सचिवांची ही उपस्थिती राहणार आहे. 


पाशा पटेल आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी... 


सोयाबीन मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे पीक... शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचे काम सातत्याने पाशा पटेल यांनी केलं आहे. सोयाबीनच्या बाजारपेठेत कायमच दराची चढउतार असते. सोयाबीन राखून ठेवा योग्य भाव आल्यानंतर विका हे मार्केटचं गणित सातत्यानं पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना सांगितलं आहे. त्यामुळे शेतकरी हा सोयाबीनचा आंतरराष्ट्रीय दर, देशातील दर आणि राज्यातल्या दरांवर लक्ष ठेवून असतात. यातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वेळोवेळी फायदाच होत गेला आहे. ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार या विषयावर शेतकरी संघटना कायम आक्रमक होत आली आहे. मात्र पाशा पटेल यांनी सातत्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचे प्रश्न दर यासंदर्भात विविध आंदोलन केली सोयाबीन परिषदा घेतल्या शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण केली. यामुळे सोयाबीन उत्पादनात वाढ झाली सोयाबीनचे क्षेत्र वाढलं आणि शेतकऱ्यांमध्ये सोयाबीन पासून आर्थिक उत्पन्नाचे स्रोत निर्माण झाले. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


मी मागील अनेक वर्षांपासून सोयाबीनबद्दल बोलत आलो आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी हा अल्पभूधारक शेतकरी आहे. कोरडवाहू शेती करणारा शेतकरी आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसारखा तो आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही. त्याच्या अडचणी त्याचे प्रश्न कुणीतरी मांडले पाहिजेत या एकाच भूमिकेतून सातत्यानं हे काम मी करत आलो आहे. सोयाबीनसाठी हमीभाव, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करणं असेल, असे काही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले, तर देश खाद्यतेलाबाबत स्वयंपूर्ण होऊ शकतो. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनाही उत्तम पैसा मिळू शकतो. यासाठी कायम संघर्ष केला आहे, असं मत शेतकरी नेते पाशा पटेल यांनी व्यक्त केलं आहे.