मुंबई : गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav 2023) काही दिवसच उरले असून गणेशोत्सव मंडळांची लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सव मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी, असे आवाहन टाटा पॉवरने केले आहे. अधिकृत कनेक्शन घेण्यासाठी टाटा पॉवरने मागील वर्षी आलेल्या अर्जांनुसार आधारित गणेशोत्सव मंडळाशी आधीच संपर्क साधला आहे. गेल्या वर्षी टाटा पॉवरने 180 गणेश मंडळांना नवीन कनेक्शन दिली होती. टाटा पॉवर किमान कागदपत्रांसह तात्पुरत्या स्वरुपात गणेश मंडळाना वीज जोडणी देतानाच निवासी शुल्क श्रेणीतील दर आकारणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना मोठा फायदा होणार आहे. टाटा पॉवर कंपनीकडून मुंबई उपनगरात वीज पुरवठा केला जातो.
सार्वजिनक गणेशोत्सव मंडळे टाटा पॉवर ग्राहक पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या व्यतिरिक्त कस्टमर रिलेशन्स सेंटर्सकडे वैयक्तिकरित्या किंवा एलईसीद्वारे ओळखीचा पुरावा, मालकीचा पुरावा, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ना-हरकत प्रमाणपत्र आणि इतर काही किमान कागदपत्रांसह संपर्क साधू शकतात. टाटा पॉवर विद्युत सुरक्षिततेशी संबंधित जागरूकता मार्गदर्शन सत्रांचेही आयोजन करते. मागील वर्षी कंपनीने सर्व गणेश मंडळापर्यंत पोहोचून 150 हुन अधिक वीज ग्राहक सुरक्षिता जागरुकता सत्रे आयोजित केली होती. गणेश मंडळांना भेट देणाऱ्या सर्व भाविकांच्या सुरक्षेसाठी यावर्षीही अशाच प्रकारच्या उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती टाटा पॉवरच्यावतीने देण्यात आली. सणासुदीच्या काळात विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरक्षेबाबत जनजागृती करण्याची टाटा पॉवरची योजना आहे.
याबरोबरच टाटा पॉवरकडे एक मान्यताप्राप्त डीएसएम (DSM) प्रोग्राम आहे ज्याद्वारे कंपनी LED ट्यूब लाइट्स, BLDC पंखे आणि स्टार रेटेड एअर कंडिशनर्स सारखी ऊर्जा कार्यक्षम उपकरणे पुरविते . जे ग्राहक नवीन कनेक्शनसाठी अर्ज करतात त्यांना याबाबत माहिती देत असल्याचे कंपनीने म्हटले. गेल्या वर्षी आम्ही अशा प्रकारे 55 पेक्षा जास्त गणेश मंडळांमध्ये उत्पादने प्रदर्शित केली होती. या व्यतिरिक्त टाटा पॉवरने सामान्य जनतेला वापराचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी आणि त्यासाठीचे सकारात्मक वातावरण निर्माण करतानाच त्यांना ग्रीन इलेक्ट्रिक वाहने घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ईव्ही चार्जर बसवले आहेत.
असा असेल वीज दर
युनिट / दर
0-100 3.34 रुपये प्रति युनिट
101-300 5.89 रुपये प्रति युनिट
301-500 9.34 रुपये प्रति युनिट
500 हून अधिक 10.4रुपये प्रति युनिट
शासनाच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक
गणेशोत्सव साजरा करताना स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभाग तसेच राज्य शासनाकडून वेळोवेळी कळवण्यात आलेल्या सूचना, नियम अथवा आदेशांचे सर्व गणेश मंडळांना पालन करणे बंधनकारक राहणार असणार आहे. उत्सव संपल्यानंतर सर्व गणेश मंडळांनी 3 दिवसांच्या आत स्वखर्चाने संबंधित मंडप, स्टेज कमान, रनिंग मंडप तसेच रस्त्यावरील देखावे, विटांमधील बांधकामे, देखाव्यातील मूर्ती आणि अन्य साहित्य रस्त्यांवरुन ताबडतोब हटवून घेणे तसेच रस्त्यावरील घेतलेले खड्डे स्वखर्चाने सिमेंट काँक्रिटमध्ये बुजवून मनपाची जागा सुस्थितीत करणे बंधनकारक राहिल.