मुंबई : लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्षाविरोधात काम करणाऱ्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर कारवाई करणार असल्याचे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. आज मुंबई येथे काँग्रेसची पत्रकार परिषद झाली. यावेळी पक्षाविरोधात काम कारणाऱ्यांविरोधात अशोक चव्हाण आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते पी. चिदंबरमदेखील उपस्थित होते.


अशोक चव्हाण म्हणाले की, विधानसभा निवडणुकीला चार महिने शिल्लक आहेत. त्याअगोदरच पक्षाविरोधात काम करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर या कारवाई केली जाईल.

विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखेंनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखेंच्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर विखेंनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. विखे काल शिर्डीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झाले होते. त्यामुळे चव्हाणांच्या बोलण्याचा रोख हा विखेंकडे असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांबद्दलही चव्हाण यांनी भाष्य केले. चव्हाण म्हणाले की, नितेश राणे, कालिदास कोळंबकर आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्ष सोडल्यामुळे पक्षाला काहीही फरक पडणार नाही. काँग्रेस खूप मजबूत आहे.