अहमदनगर : पारनेर नगरपंचायतीमधील राष्ट्रवादीत गेलेल्या पाच नगरसेवकांची शिवसेनेत घरवापसी झाली. मात्र या नगरसेवकांची नाराजी अद्याप दूर झालेली दिसत नाही. या नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या पत्रात या नगरसेवकांनी पारनेरचे शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
शिवसेनेचे नगरसेवक नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी, डॉ. सय्यद, किसन गंधाडे यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाला कंटाळून 4 जुलै रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निरोप दिल्यानंतर या पाचही नगरसेवकांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. मात्र पारनेरमधील माजी आमदार विजय औटी यांनी राजीनामा नाही दिला तर पारनेर तालुक्यात एकही शिवसैनिक राहणार नाही, अशा आशयाचे पत्र या नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.
'त्या' नगरसेवकांना अजित पवारांनी फोडलं असं म्हणता येणार नाही : संजय राऊत
या पक्ष प्रवेशानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी या पाचही नगरसेवकांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला. याआधी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह या पाचही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत 20 मिनिटं चर्चा केली होती. या संपूर्ण प्रकरणात शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांच्या मुत्सद्देगिरीला यश आल्याचं म्हटलं जात आहे.
...म्हणून त्यांना राष्ट्रवादीत घेतलं : आमदार निलेश लंके
शिवसेनेचे पाच नगरसेवक भाजपमध्ये जात होते, म्हणून राष्ट्रवादीत घेतले. याबाबत अजित पवार यांना भेटलो होतो. आता शिवसेनेच्या नगरसेवकांनी घरवापसी केली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांची नाराजी ऐकली, ती दूर करण्याचे आश्वासनही दिल्याचं निलेश लंके यांनी सांगितलं.
Parner | '...तर पारनेरमध्ये शिवसैनिक शिल्लक राहणार नाही'; नाराज नगरसेवकांचं उद्धव ठाकरे यांना पत्र