मुंबई : "पारनेरमध्ये आमच्या काही नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. याचा अर्थ अजित पवारांनी किंवा वरिष्ठ नेत्यांनी नगरसेवक फोडले असा होत नाही. त्यामुळे आता हा विषय आता चर्चेत येऊ नये, असं मला वाटतं," असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. तसंच महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरबुरी नाहीत. अंतर्विरोध, मतभेद हे शब्द महाविकासआघाडीत नाहीत. तसंच हे सरकार पाच वर्षे चालणार असल्याचा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.
'हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल'
मुख्यमंत्र्यांचं सर्व बारीक-सारीक गोष्टींकडे लक्ष आहे. मुंबई पोलिसातील बदल्यांचं कुणी राजकारण करु नये, त्यावरुन काही वाद नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं. तसंच महाविकास आघाडीच्या नेतृत्वात मतभेद नाहीत. महाविकास आघाडीत अंतर्विरोध, अंतरपाट नाही, आम्ही वरमाला घातल्या आहेत. तीन प्रमुख पक्षांनी हे सरकार बनवलं आहे, ही खिचडी नाही, हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्वास करत देवेंद्र फडणवीस जे शब्द वापरत आहेत त्यांचा अर्थ तितकासा खरा नाही, असंही संजय राऊत म्हणाले.
पारनेर नगरपालिकेतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने दोन्ही पक्षांमध्ये तणाव असल्याचं चर्चा रंगली होती. तसंच शिवसेनेचे नगरसेवक परत पाठवा असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज स्पष्टीकरण दिलं आहे.
पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक परत पाठवा, उद्धव ठाकरे यांचा अजित पवारांना निरोप; सूत्रांची माहिती
संजय राऊत म्हणाले की, "पारनेरच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली आहे. हा स्थानिक स्तरावरचा विषय होता, तो त्या पातळीवरच संपायला हवा होता. आमच्या काही नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. याचा अर्थ अजित पवारांनी किंवा वरिष्ठ नेत्यांनी नगरसेवक फोडले असा होत नाही. त्यामुळे आता हा विषय आता चर्चेत येऊ नये, असं मला वाटतं. स्थानिक राजकारणाचा भाग होता. यापुढे असा निर्णय घेताना एकमेकांशी बोलावं. काही गोष्टी अनावधनाने घडत असतात. त्या प्रसंगाचं काय होईल याची कल्पना नसते, जिथे व्हायची तिथे चर्चा झाली आहे. त्यामुळे कुरबुरी, धूसफूस आहे असं बोलू नये."
...म्हणून त्या नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश : रोहित पवार
पारनेरमधील शिवसेनेच्या नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरुन आमदार रोहित पवार यांनी खुलासा केला आहे. महाविकास आघाडीत सर्व निर्णय हे वरच्या पातळीवर होतात. त्यामुळे चर्चा झाल्याशिवाय कुठला निर्णय होत नाही, असं रोहित पवार म्हणाले. इतकंच नाही तर राष्ट्रवादीत प्रवेश केलेले पाचही नगरसेवक अंतर्गत राजकारणाला कंटाळून दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार करत होते. त्याचा दुष्परिणाम हा महाविकास आघाडीवर होऊ नये, यासाठी त्यांचा प्रवेश राष्ट्रवादी केल्याचं रोहित पवारांनी स्पष्ट केलं.
पाच नगरसेवक शिवसेनेत
पारनेर नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी 4 जुलै रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती इथे हा प्रवेश झाला. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आज बारामतीत येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी पारनेर तालुक्यातील शिवसेनेतून निवडून आलेल्या पाच नगरसेवकांना बरोबर आणत थेट राष्ट्रवादीत प्रवेशही घडवून आणला. पारनेर नगरपंचायतीच्या नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी, डॉ. सय्यद, किसन गंधाडे यांनी आज बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे पारनेरच्या राजकारणात आज एकच खळबळ उडाली आहे. माजी आमदार आणि मंत्री विजय औटी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. परंतु या पक्ष प्रवेशानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाल्याचं म्हटलं जात होतं.