अहमदनगर : पारनेर तालुक्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. पारनेर नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथे हा प्रवेश घेतला आहे. माजी आमदार आणि मंत्री विजय औटी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.


पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आज बारामतीत येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी पारनेर तालुक्यातील शिवसेनेतून निवडून आलेल्या पाच नगरसेवकांना बरोबर आणत थेट राष्ट्रवादीत प्रवेशही घडवून आणला. पारनेर नगरपंचायतीच्या नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी, डॉ. सय्यद, किसन गंधाडे यांनी आज बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे पारनेरच्या राजकारणात आज एकच खळबळ उडाली आहे. या सर्वांच्या प्रवेशाने पारनेरमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे.

Lockdown Again | राज्यात पुन्हा टाळेबंदीवर शरद पवार यांची नाराजी

महाविकास आघाडीत तणाव होणार?
शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष सरकारमध्ये सोबत काम करत असताना हा पक्षप्रवेश झाल्याने या दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, याचा दोन्ही पक्षातील संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही, असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. 'सध्या राष्ट्रवादीत असलेले पारनेरचे आमदार निलेश लंके हे आधी शिवसेनेतच होते. आता राष्ट्रवादीत प्रवेश केलेले 5 नगरसेवक हे आमदार लंके यांना माननारे होते. त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश झाला,' असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अहमदनगरचे शिवसेनेच माजी आमदार अनिल राठोड यांनी मात्र यावर टीका केली आहे. ही पळवापळवी चुकीचे असल्याचं त्यांनी म्हटलंय.

माजी आमदार औटी यांना मोठा धक्का
आमदार निलेश लंके हे आधी शिवसेनेत होते. मात्र, काही कारणास्तव माजी आमदार विजय औटी आणि लंके यांच्यात वाद झाला. त्यानंतर लंके यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीचे घड्यात हातात बांधले. त्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीत ते निवडूनही आले. त्यामुळे विजय औटी यांना त्यावेळी मोठा धक्का बसला होता. आता शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने औटी यांच्यावर लंके यांनी करघोडी केल्याचे बोलले जात आहे.

Shivsena, Parner | अहमदनगर - पारनेर तालुक्यात शिवसेनेला मोठं खिंडार