मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेत ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या लॉकडाऊन लागू आहे. मात्र कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी याठिकाणी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


ठाणे


सध्या सुरू असलेला लॉकडाऊन 19 जुलैच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाढवण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी घेतला आहे. आधी 2 जुलै ते 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र इतका कालावधी पुरेसा नसून त्यामध्ये वाढ करण्याची आवश्यकता असल्याने आणखी 8 दिवस आता लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या कालावधीत जास्तीत जास्त चाचण्या करणे आणि कॉन्टॅक्ट स्ट्रेसिंग वाढवणे हे दोन मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्याप्रमाणे महानगरपालिकेने गेल्या काही दिवसात रोज होत असलेल्या चाचण्यांची संख्या वाढवली. आधी दिवसाला अंदाजे 800 नागरिकांच्या चाचण्या व्हायच्या. तीच संख्या 2 जुलै पासून ते आजपर्यंत दर दिवशी 1300 इतकी वाढवण्यात आली आहे. मात्र असे असले तरी या कामासाठी दहा दिवस पुरेसे नसल्याने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. 2 जुलैपासून जे नियम लागू होते ते सर्व नियम 19 तारखेपर्यंत लागू राहतील. मात्र घरकाम करणाऱ्या महिला आणि पुरुषांना यामधून मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे घर कामासाठी जाणारे कर्मचारी लॉकडाउनच्या काळात बाहेर पडू शकतात. जर त्यांना एखाद्या सोसायटीने प्रवेश दिला नाही तर त्या सोसायटीवर कारवाई करू असेही गणेश देशमुख यांनी सांगितले. मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळून इतर सर्व नागरिकांना या लॉकडाउनच्या नियमांचे प्रामाणिकपणे पालन करावे लागेल. तरच रुग्ण संख्या कमी करण्यास मदत होईल असे पालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.


पुणे, पिंपरी-चिंचवड

पुणे, पिंपरी चिंचवड आणि त्यांना लागून असलेल्या गावांमधे 13 तारखेला मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागू होईल. पुणे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीचा, पुणे कॅन्टेन्मेट आणि हवेली तालुक्यातील गावांचा यामधे समावेश होतो. हा लॉकडाऊन 10 दिवसांसाठी म्हणजे 23 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत असेल. दहा दिवसांचा हा लॉकडाऊन पाच-पाच दिवसांच्या दोन टप्प्यांत असेल. पहिल्या पाच दिवसांमधे फक्त दूध, औषधं आणि वृत्तपत्रं सुरू राहतील. इतर सर्व गोष्टी बंद राहतील. नागरिकांनी या काळात लागणाऱ्या गोष्टी दोन दिवसांमध्ये खरेदी कराव्या लागणार आहेत. पाच दिवसांच्या दुसऱ्या टप्प्यांत लोकांना त्यांना हव्या असलेल्या गोष्टींच्या सकाळी 10 ते संध्याकाळी 4 या कालावधीत खरेदी करता येतील. दहा दिवसांच्या या कालावधीचा उपयोग महापालिका टेस्टींग वाढविण्यासाठी आणि कॉन्टॅक्ट ट्रेसींगसाठी करेल. दहा दिवसांनंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेला एकही व्यक्ती बाहेर राहू नये, असा आमचा उद्देश आहे, अशी माहिती पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.


औरंगाबाद


औरंगाबाद शहरातही कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 18 जुलैपर्यंत ही संचारबंदी असेल. संचारबंदीच्या काळात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. प्रत्येक चौकाचौकात पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारी 3 वाजेपर्यंत 183 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत..


मीरा-भाईंदर


मीर भाईंदर महापालिका हद्दीत 18 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. यापूर्वीचा लॉकडाऊन 10 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत होता. आता 11 जुलै ते 18 जुलैपर्यंत 12 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात किराण दुकानं पूर्णपणे बंद राहतील. डेअरी सकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत सुरु राहील. औषधाची दुकानं सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुली राहतील. वृत्तपत्र विक्री सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरु राहील.


कल्याण-डोंबिवली


कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत आधी 2 जुलै ते 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू होता. केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार आता 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनचे नियम पूर्वीप्रमाणेच असतील. अत्यावश्यक सेवांना परवानगी, किराणा, दारू दुकानं फक्त होम डिलिव्हरी सुरु राहील.


संबंधित बातम्या