Parli Vaijnath Jyotirlinga : सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालम्ॐकारममलेश्वरम्॥ परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमाशंकरम्। सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने॥ वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे। हिमालये तु केदारम् घुश्मेशं च शिवालये॥ एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति॥, अत्यंत पवित्र व शुभ मानल्या जाणाऱ्या द्वादश ज्योतिर्लिंगाची महती सांगणारा हा श्लोक. या श्लोकात बारा ज्योतिर्लिंगाची नावे नमूद करण्यात आली आहेत. मात्र, बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे असणाऱ्या ज्योतिर्लिंगाबाबत वाद आहेत. बारा ज्योतिर्लिंगापैकीचे पाचवे  ज्योतिर्लिंग हे परळी वैजनाथ येथील नसून उत्तर भारतातील असावे असा दावा करण्यात येतो. मात्र, या वादावर आता पडण्याची शक्यता आहे. 


वैजनाथ ज्योतिर्लिंग स्थान हे नि:संशय परळी वैजनाथ हेच आहे. आद्य शंकराचार्यांपासुन ते आजपर्यंत सर्वांनी हेच स्थान दिग्दर्शित केलेले आहे. त्यामुळे हा कोणाच्या मान्यतेचा विषयच नाही तरीपण या मुद्यावरून होणारा संभ्रम दुर करण्यासाठी काशीच्या विद्वतसभेत या मुद्द्याची पुनर्मांडणी करणार असल्याची ग्वाही संकेश्वरपिठाधिश शंकराचार्य अभिनव विद्यानृसिंह स्वामी व अन्य संत-महंतांनी परळीतील धर्मसभेत दिली.


संकेश्वर पिठाचे शंकराचार्य जगद्गुरू प.प.अभिनव विद्यानृसिंह स्वामी महाराज, दंडीस्वामी प.पु. अमृताश्रम स्वामी महाराज, हिमाचल प्रदेश येथील जयदेव आश्रम स्वामी महाराज, स्वामी मधुरानंदजी आदी संत-महंत परळी शहरात धर्मसभेसाठी आले होते. या दौऱ्या दरम्यान त्यांनी ज्योतिर्लिंग प्रभू वैजनाथ दर्शन घेतले. त्याशिवाय नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन अध्यात्मिक मार्गदर्शन व हितगुज केले. 


हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, प्रभू शंकर ज्या ठिकाणी स्वत: प्रकट झाले ती ठिकाणे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहेत. देशभरात बारा ठिकाणे आहेत. महाराष्ट्रासह, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू या राज्यांमध्येही ज्योतिर्लिंग आहेत. परळी-वैजनाथ येथील ज्योतिर्लिंगाच्या दाव्यावरून मतभिन्नता आहे. वैजनाथ येथील ज्योतिर्लिंग हे हिमाचल प्रदेशातील बैजनाथ येथील असल्याचाही दावा करण्यात येतो. 


या दावे-प्रतिदाव्याच्या पार्श्वभूमीवर  संकेश्वरपिठाधिश शंकराचार्य अभिनव विद्यानृसिंह स्वामी यांनी वैजनाथ येथील शिव मंदिर हेच ज्योतिर्लिंग असल्याचे वक्तव्य महत्त्वाचे असल्याचे म्हटले जात आहे.