BJP corporater in KDMC will join Shivsena : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) शिवसेनेने भाजपला धक्का दिला आहे. भाजपच्या 'मिशन लोटस'ला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेने 'मिशन धनुष्य'ने सुरुवात केली आहे. भाजपचे विद्यमान पाच ते सहा नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. 


कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीआधीच नगरसेवकांनी भाजपला रामराम केला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपला हा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. महापालिकेची मुदत संपल्याने सध्या प्रशासकीय राजवट लागू आहे. मागील काही वर्षांपासून कडोंमपावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. या वर्चस्वाला धक्का लावण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. 


कडोंमपामध्ये पक्षीय बलाबल काय?


कल्याण-डोंबिवली महापालिकेत 122 जागा असून त्यापैकी 52 जागा ह्या शिवसेनेकडे आणि भाजपकडे 42 जागा आहेत. काँग्रेसकडे 4, राष्ट्रवादीकडे 2, मनसेकडे 9, एमआयएमकडे 1 आणि 10 जागा अपक्षांकडे होत्या. मागील निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे राज्यातील सत्तेत असतानाही स्वतंत्रपणे लढले होते. भाजपने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात जोरदार मुसंडी मारली होती. 


कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये कल्याणमधील 27 गावांचा समावेश आहे. सध्या याबाबत उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायलयाच्या निर्णयावर कडोंमपाची प्रभाग रचना ठरणार आहे.  


कडोंमपाची सत्ता ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू  आहे. त्यासाठी व्यूहरचना ठरवली जात आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप आणि मनसेची युती होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. कल्याण-डोबिंवली महापालिकेतील शिवसेनेच्या सत्तेला धक्का देण्याची तयारी भाजपकडून सुरू असली तरी शिवसेनाही सावध असल्याचे चित्र आहे. भाजप नगरसेवकांचा शिवसेनेत होणार पक्ष प्रवेश हे त्याचेच उदाहरण असल्याचे म्हटले जात आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


अमरावतीसारख्या घटना होऊ नयेत म्हणून, विरोधी पक्षनेत्यांनी आगीत तेल ओतू नये : संजय राऊत


Ulhasnagar : राष्ट्रवादीची ताकद वाढल्यानं शिवसेनेची हातमिळवणी! कलानी परिवाराच्या हाती उल्हासनगरचा रिमोट कंट्रोल