नांदेड : नांदेडच्या भाग्यानगर भागात काल 2 पुणेरी गोल्डमॅनमुळे हजारो विद्यार्थ्यांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला. नांदेडच्या भाग्यानगर परिसरात अनेक खासगी क्लासेस असून या ठिकाणी राज्यातील विविध भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. याच भागात काल एका कॉफी शॉपचं उदघाटन दोन पुणेरी गोल्डमॅनच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आयोजकांनी कर्णकर्कश आवाजात गाणी लावून गोल्डमॅनचं स्वागत केलं. त्यामुळे परिसरातील क्लासेसच्या विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. तर, या चमकू गोल्डमनच्या उपस्थितीमुळे झालेल्या गर्दीत कोरोना नियमांचंही उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळालं.


भाग्यानगर परिसरातील कॉफी शॉपच्या उदघाटन कार्यक्रमामुळे NEET, JEE चे शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झालाय. नांदेड शहरात MBBS ला जाण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून शिक्षण घेण्यासाठी हजारो विद्यार्थी नांदेड शहरात दाखल होतात. त्याचप्रमाणे येथील नावाजलेल्या नीटचे यथायोग्य शिक्षण देणाऱ्या क्लासेस आणि शिक्षणाचा दर्जा यामुळे पालकांचाही मोठा कल नांदेड जिल्ह्याकडे आहे. परंतू शिक्षणाचं केंद्रबिंदू बनत असलेल्या या नांदेड शहराला राजकीय लोकांचा कृपा आशीर्वाद असणाऱ्या लोकांनी बदनाम करण्याचा चंग या मंडळींनी बांधलाय. कारण या परिसरातील कॉफी शॉप,स्मोकिंग झोन बनलेल्या हॉटेलमुळे अनेक तरुण-तरुणी वाममार्गाला लागत आहेत. त्यातच या परिसरात आज नवीन उघडलेल्या या कॉफी शॉपच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या धिंगाण्याने ,मुलांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ होत असल्याचे चित्र आहे.


भाग्यनगर परिसरातील क्लासेस समोरील एका कॉफी शॉपचं उदघाटन दोन पुणेरी गोल्डमॅनच्या हाताने करण्यात आले. परंतू या कार्यक्रमातील कर्णकर्कश आवाजामुळे,जमलेल्या प्रचंड गर्दीमुळे कोरोना नियमांचे तीनतेरा तर झालेच,सोबत त्या परिसरात नीट क्लासेससाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे सुद्धा या गोंधळामुळे मोठे नुकसान झाले. परिणामी आवाजाच्या त्रासामुळे अनेक क्लासेस मधील विद्यार्थ्यांना वर्गा बाहेर सोडावे लागले.


या अगोदर नीटसाठी महाराष्ट्रातील बहुसंख्य विद्यार्थी-पालकांचा कल लातूर जिल्ह्याकडे होता.परंतु त्याठिकाणी घडलेल्या काही  असामाजिक घटनेमुळे लातूरकडे जाण्याचा पालक व विद्यार्थ्यांचा कल कमी झाला.त्यानंतर लातूर येथील अनेक नामांकित नीट क्लासेसने आपले बस्थान लातुरातून नांदेडात बसवले आणि हळूहळू नांदेड या परिक्षांच्या क्लासेसचे माहेरघर बनले.


नांदेड मधील भाग्यानगर परिसरात यशवंत महाविद्यालय, फार्मसी कॉलेज, महात्मा फुले विद्यालय, अशा नामांकित शिक्षण संस्था आणि क्लासेस चालतात. त्यामुळे अल्पावधीतच शिक्षणाचे माहेरघर ठरलेल्या नांदेड जिल्ह्याला लातूरच्या घटने सारखा फटका बसून शिक्षण हब क्षेत्र ओस पडण्यास वेळ लागणार नाही हे मात्र नक्की.