बीड : कुणावरही येऊ नये अशी वेळ बीड जिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या 22 दिवसांच्या तान्हुलीवर आली आहे. ही मुलगी आपली नसल्याचं आई-वडिलांचं म्हणणं आहे, ज्यामुळे या मुलीला जन्मल्यापासून अजून मातृत्त्वाची ऊबही मिळू शकलेली नाही. अखेर पुन्हा एकदा ही मुलगी अनाथ झाली आहे.
मोठ्या गोंधळानंतर या मुलीचा ताबा आई-वडिलांना देण्यात आला होता. मात्र आपण ही मुलगी सांभाळण्यासाठी समर्थ नाही, असा अर्ज थिटे दाम्पत्याने बीड जिल्हा महिला आणि बालकल्याण समितीकडे दिला. समितीने दाम्पत्याचं समुपदेशनही केलं, मात्र काहीही उपयोग झाला नाही. अखेर या चिमुकलीची रवानगी औरंगाबादच्या शिशुगृहात करण्यात आली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
बीड जिल्ह्यातील वडवणीतील थिटे दाम्पत्याचा आरोप होता, की आपल्याला मुलगा जन्माला आला, मात्र हाती मुलगी देण्यात आली. 11 मे रोजी या बाळाने बीडच्या जिल्हा रुग्णालयात जन्म घेतला. त्या नंतर चार-पाच दिवस या बळावर उपचार झाले. नंतर मात्र या बाळाला इथल्याच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. इथे मात्र ही मुलगी असल्याची नोंद डॉक्टरांनी केली आणि मुलीच्या आई-वडिलांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. कारण, जिल्हा रुग्णालयाच्या नोंदीमध्ये या बाळाची नोंद मुलगा अशी करण्यात आली होती.
पोलिसात तक्रार केल्यानंतर हे दाम्पत्य ही मुलगी आमची नाहीच, यावर ठाम होतं. या नंतर आईने या मुलीला दूध पाजणं बंद केलं. चिमुकलीला झालेलं इंफेक्शन वाढत होतं, म्हणून या मुलीला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं. इकडे पोलीस या सर्व प्रकरणाचा तपास कसून करत होते. त्यासाठी डीएनए घेण्यात आले आणि तब्बल 19 दिवसानंतर ही मुलगी राजू आणि छाया थिटे यांचीच असल्याचं डीएनए अहवालात उघड झालं.
डीएनए चाचणी थिटे दाम्पत्याला मान्य नाही
मुलगी आपलीच असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर सुद्धा हे निर्दयी आई-वडिल एक दिवस पोलीस स्टेशनला पोहोचलेच नाहीत. अखेर बीड पोलिसांनी या आई-वडिलांना सोबत घेऊन घाटी रुग्णालय गाठलं आणि रितसर या मुलीचा ताबा आई-वडिलांना देण्यात आला.
या बाळाचं इंफेक्शन कमी झालं नसल्याने बाळावर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले. इथून पुढचा या मुलीचा ताबा तिच्या आई-वडिलांकडे देण्याचे सोपस्कार पोलिसांनी रुग्णालयातच पार पाडले. मात्र डीएनए चाचणी मान्य नसल्याचं सांगत आपण या मुलीला सांभाळण्यासाठी असमर्थ आहोत, असा अर्ज या दाम्पत्याने केला.
रुग्णालयाची चूक झाल्यामुळे जन्मापासूनच या मुलीवर संघर्षाची वेळ आली आहे. ना आईचं दूध मिळालं, ना मातेच्या प्रेमाची ऊब मिळाली. बीड-औरंगाबाद असा प्रवास या चिमुकलीचा सुरु आहे. पुन्हा एकदा तान्हुलीला औरंगाबादला नेण्यात आलंय.
संबंधित बातमी :
रुग्णालयाच्या एका चुकीमुळे तान्हुली 21 दिवस आईच्या दुधाविना!
'ती' तान्हुली पुन्हा अनाथ, आई-वडिलांचे हात वर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Jun 2018 06:05 PM (IST)
ही मुलगी आपली नसल्याचं आई-वडिलांचं म्हणणं आहे, ज्यामुळे या मुलीला जन्मल्यापासून अजून मातृत्त्वाची ऊबही मिळू शकलेली नाही. अखेर पुन्हा एकदा ही मुलगी अनाथ झाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -