परभणी : परभणीच्या पालम नगरपंचायत निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय त्यांच्याकडून 25 हजार रोख आणि मतदार याद्या ही जप्त करण्यात आल्या आहेत. लाल खान पठाण असे गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे नाव आहे.


परभणी जिल्ह्यातील एकमेव नगर पंचायत असलेल्या पालम नगर पंचायतची निवडणूक सुरू असून उद्या मतदान होणार आहे. 17 जागांपैकी ओबीसी आरक्षित 4 जागा सोडून 13 जागांसाठी ही निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीसाठीच पैसे वाटप करताना या खान याला पकडण्यात आले होते.  


काल रात्री म्हणजे 19 डिरेंबर रोजी पालम शहरातील वॉर्ड क्रमांक 14 मध्ये हाके गल्लीत राष्ट्रवादीचे उमेदवार लाल खान पठाण हे आपल्या साथीदारांना घेऊन पैसे वाटप करत असल्याची माहिती निवडणूक विभाग फिरते गस्त प्रमुख आकाश पोळ यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोळ यांनी पथकासह या ठिकाणी धाड टाकली. यावेळी एका रजिस्टरमध्ये मतदार यादी घेऊन 500 रुपये प्रमाणे वाटप सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पथक प्रमुखांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता लाल खान पठाण आणि एक जण धक्काबुक्की करून पळून गेले. मात्र पथकाने इतर 5 जणांना पकडले. त्यांच्याकडून 25 हजार रुपये जप्त करण्यात आले असून मतदार यादी ही जप्त करण्यात आल्या आहेत.


दरम्यान, या प्रकरणात आज पालम पोलिसांत लाल खान पठाण, रमेश वाघमारे, अलीम खान पठाण, ज्ञानोबा घोरपडे, भागवत हाके, मधुकर हाके, बापूराव कवडे या 7 जणांवर भारतीय दंड संहिता 1860 कलम 186,188, 353, 171 e, 171 b, महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत, औद्योगिक नगर अधिनियम 1965 कलम 22 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


महत्वाच्या बातम्या 


परभणीत काँग्रेसला लागली गळती; सोनपेठ,गंगाखेड नगराध्यक्षानंतर परभणी मनपाच्या सदस्याची पक्षाला सोडचिठ्ठी


परभणी जिल्हा परिषदेने केला रिलायन्स कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा ठराव