Sant Gadge Maharaj: स्वच्छतेची शिकवण देऊन किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे थोर संत म्हणजे गाडगे महाराज (Gadge Maharaj) मानवतेचे खरे परोपकारी, सामाजिक समरसतेचं मूर्त स्वरूप म्हणजे गाडगे महाराज. गाडगे महाराजांनी गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी आयुष्यभर तळमळीने कार्य  केले. दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करत त्यांनी माणसातील अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून दिली. आज अशा थोर समाजसुधारक असलेल्या गाडगे महाराजांची पुण्यतिथी आहे.


गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध मान्यवरांनी त्यांना आज अभिवादन केले आहे. हातात झाडू घेऊन परिसराच्या व मनाच्या स्वच्छतेची शिकवण देणाऱ्या संत गाडगे महाराजांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन! असे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. किर्तनाच्या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य करणारे कर्मयोगी संत गाडगे महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त सादर नमन असे ट्वीट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील ट्वीट करत गाडगे महाराजांना अभिवादन केले आहे.


गाडगेबाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेणगांव येथे झाला होता. डेबूजी झिंगारजी जानोरकर असे त्यांचे नाव होते. गाडगेबाबांचे बालपण मुर्तिजापूर तालुक्यातील दापुरे या त्यांच्या मामाच्या गावी गेलं. गाडगे महाराज चालते फिरते विद्यापीठ होते. आपल्या मुलीच्या जन्मानंतर नातेवाईकांना त्यांनी मांसाहाराचे जेवण न देता गोडाधोडाचे जेवण दिले. हा त्या काळी केलेला फार मोठा बदला होता. पायात तुटकी चप्पल, डोक्यावर फुटके गाडगे, अंगात चिंध्यापासून तयार केलेला पोषाख त्यांचा असायचा.


किर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन
गाडगे महाराज हे सामाजिक रुढी आणि परंपरेवर जोरदार प्रहार करत होते. किर्तनाच्या माध्यमातून त्यांनी आयुष्यभर प्रबोधनाचे काम केले. गाडगेमहाराज यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन होता. त्यांनी समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले. स्वच्छता आणि चारित्र्याची शिकवण दिली. गाडगे महाराजांमध्ये गोरगरीब, दीनदलित ह्यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चटन करण्यासाठी तळमळ होती. लोकांमधील अंधश्रद्धा आणि गरीबी दूर करण्यासाठी शिक्षणाचे महत्व त्यांना माहित होते. प्रसंगी घरातील वस्तू विका पण आपल्या पाल्यांना शिकवा असे ते नेहमी सांगायचे.


माणसात देव शोधणारे संत
गाडगे महाराज नेहमी सांगायचे, देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराण, मंत्र-तंत्र, चमत्कार सारख्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, ही त्यांची शिकवण होती. माणसातच देव आहे असे त्यांचे मत होते. याचाच शोध ते घेत होते. संत तुकाराम महाराजांना ते आपले गुरु मानत असत. गाडगे महाराजांचे 20 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. पण आजही त्यांचे विचार आणि आदर्श प्रत्येकाच्या हृदयात जिवंत आहेत.


गावोगावी जाऊन स्वच्छता केली
कोणत्याही गावात गेल्यावर गाडगेमहाराज लगेचच रस्ते साफ करायचे. त्यांचे काम संपले की ते स्वतः स्वच्छतेबद्दल गावातील लोकांना सांगायचे. गावातील लोकं गाडगेबाबांना जे पैसे द्यायचे त्या पैशांचा नि:स्वार्थपणे ते सामाजिक विकास आणि समाजाच्या भौतिक विकासासाठी वापर करत होते. त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक धर्मशाळा, गोशाळा, शाळा, रुग्णालये आणि वसतिगृहे बांधली. भिक मागून त्यांनी हे सर्व उभारले. पण, या महापुरुषाने आयुष्यभर स्वत:साठी झोपडीही बांधली नाही. त्यांनी आपलं सर्व आयुष्य धर्मशाळांच्या व्हरांड्यावर किंवा झाडांखाली घालवले.


गाडगे महाराजांनी पंढरपूर, देहू, आळंदी, नाशिक, मुंबई येथे अनेक धर्मशाळा बांधल्या. जनकल्याणाची अनेक कामे केली. आपले जीवन त्यांनी विरागी व धर्मशील वृत्तीने व्यतीत केले. गाडगे महाराज समतेचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या अंतःकरणात लोककल्याणाची भावना होती. लोकांनी त्यांना संत समजून त्यांच्याविषयी भक्ति बाळगली. सामान्य लोकांसाठी त्यांनी खूप कार्य केले.