मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आले आहेत. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत सर्वांशी चर्चा करुन आज निर्णय घेऊ असं सांगितलं होतं. त्यामुळं शरद पवारांनी गृहमंत्र्यांबाबतच्या चौकशीचा आणि निर्णयाचा बॉल मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलल्यानंतर आज काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. सोबतच शिवसेनेचे मंत्री अनिल परबही अडचणीत येणार का? असा सवाल देखील उपस्थित होत आहे. कारण काल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी गृह खातं अनिल देशमुख चालवतात की अनिल परब असा सवाल करुन या प्रकरणात अनिल परब यांचं नाव घेतल्यानं भुवया उंचावल्या आहेत.
अनिल देशमुख यांच्याबाबत आज निर्णय अपेक्षित
परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जोपर्यंत देशमुख राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा भाजपने दिला आहे. काल शरद पवारांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली असली तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. आज शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठकांचं सत्र वर्षावर चालणार आहे. तर अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले जयंत पाटील
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांनंतर काल राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची तब्बल अडीच तास बैठक झाली. या बैठकीनंतर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली होती. तसेच महत्त्वाच्या गुन्ह्यापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना केला. पाटील म्हणाले की, "गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जो प्रमुख मुद्दा आहे, जी प्रमुख घटना झालेली आहे, त्यावरून लक्ष विचलीत करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. अंबानींच्या घरासमोर जे वाहन ठेवलं आणि मनसुख हिरेन यांची हत्या, याचा शोध यावरच आमचं लक्ष आहे. यानंतर यथायोग्य उर्वरीत गोष्टी होतील. सध्या एटीएस व एनआयए या प्रकरणाची चौकशी करत आहे. या चौकशीच्या माध्यमातून काही ना काही ठोस अशा गोष्टी बाहेर येतील, असा आम्हाला विश्वास आहे. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस याचं ठाम मत आहे की, जे गुन्हे झालेले आहेत, अंबानींच्या घराबाहेर जे वाहन सोडण्यात आलं आणि मनसुख हिरेन यांची हत्या याबाबतीत खोलात जाऊन ज्यांनी हे गुन्हे केलेले आहेत, त्यांना शोधून काढण्याचं काम ज्या यंत्रणा करत आहेत, त्यांचा तपास पूर्ण होणं आवश्यक आहे आणि मला खात्री आहे लवकरात लवकर तो तपास पूर्ण होईल.", असंही जयंत पाटील यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना जयंत पाटील म्हणाले होते की, "देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील अनेकांवर आरोप झाले, त्यांनी कुणालाही राजीनामा द्यायला लावला नाही. मी त्या खोलात जाणार नाही, त्यांच्याशी आमची काही त्याबाबतीत स्पर्धा नाही. परंतु जसं समोर येतंय की महत्वाच्या गुन्ह्यापासून लक्ष विचलीत करण्याचा कुणाचा जर प्रयत्न सुरू असेल, तर ते देखील होता कामा नये."
गृह विभाग नेमकं कोण चालवतंय? अनिल देशमुख की अनिल परब? : देवेंद्र फडणवीस
काल नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, या प्रकरणाची चौकशी जोपर्यंत गृहमंत्री आपल्या पदावर आहेत, तोपर्यंत होऊच शकत नाही, त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेऊन त्यानंतरच चौकशी केली पाहिजे. खरंतर आता गृहखातं कोण चालवतं हाही आमच्यासमोर प्रश्न आहे. गृहमंत्री अनिल देशमुख चालवतात की, शिवसेना नेते अनिल परब चालवतात? कारण ज्याप्रकारे सभागृहात गृहविभागाच्या मुद्द्यांवर गृहमंत्री अनिल देशमुखांऐवजी शिवसेना नेते अनिल परब बोलत होते. त्यामुळे या नियुक्त्यांमध्ये नेमकी भूमिका कोणाची हे स्पष्ट होणं गरजेचं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. '
शरद पवार काय म्हणाले...
परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप हे गंभीर असून त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी काल स्पष्ट केलं होतं. या प्रकरणी आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं सांगत त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे सर्वाधिकार आणि निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असेल असंही सांगितलं. मुख्यमंत्र्यांशी यावर उद्या चर्चा करू आणि गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय घेऊ असं शरद पवार म्हणाले. परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन बदली केल्यानंतर त्यानी गृहमंत्र्यांवर आरोप केले आहेत, आयुक्त पदावर असताना नाही असं शरद पवारांनी सांगितलं. परमबीर सिंह यांच्याशी माझी भेट झाली होती असं पवारांनी सुरुवातील स्पष्ट केलं. गृहमंत्री अनिल देशमुखांवर परमबीर सिंहांनी 100 कोटी वसूलीचे आरोप हे गंभीर असल्याचं त्यांनी सांगितलं. पण त्या पत्रावर परमबीर सिंह यांचे हस्ताक्षर नाही असंही ते म्हणाले. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना चौकशीचे सर्वाधिकार आहेत, त्यांनी योग्य ती चौकशी करावी असं पवारांनी सांगितलं होतं.