मुंबई : परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप हे गंभीर असून त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी उद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं सांगत त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे सर्वाधिकार आणि निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असेल असंही सांगितलं. मुख्यमंत्र्यांशी यावर उद्या चर्चा करू आणि गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय घेऊ असं शरद पवार म्हणाले.
परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन बदली केल्यानंतर त्यानी गृहमंत्र्यांवर आरोप केले आहेत, आयुक्त पदावर असताना नाही असं शरद पवारांनी सांगितलं. परमबीर सिंह यांच्याशी माझी भेट झाली होती असं पवारांनी सुरुवातील स्पष्ट केलं. गृहमंत्री अनिल देशमुखांवर परमबीर सिंहांनी 100 कोटी वसूलीचे आरोप हे गंभीर असल्याचं त्यानी सांगितलं. पण त्या पत्रावर परमबीर सिंह यांचे हस्ताक्षर नाही असंही ते म्हणाले. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना चौकशीचे सर्वाधिकार आहेत, त्यांनी योग्य ती चौकशी करावी असं पवारांनी सांगितलं.
शरद पवार म्हणाले की, "गृहमंत्र्यांनी मागणी केलेलं हे 100 कोटी रुपये नेमके कोणाला द्यायचे, कुणाकडं गेले ते या पत्रात नमूद केलं नाही. वाझे यांना सेवेत परत घ्यायचा निर्णय हा परमबीर सिंह यांचाच होता. वाझेंच्या नियुक्तीचा निर्णय हा गृहमंत्र्यांचा नव्हता. मनसुख यांची गाडी वाझे यांनी घेतली होती आणि त्यात त्यानी स्फोटकं ठेवली."
या प्रकरणी मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून चौकशीचे सर्वाधिकार आणि निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असेल. मुख्यमंत्र्यांनी योग्य ती चौकशी करावी आणि निर्णय घ्यावा असं शरद पवार यांनी सांगितलं.
फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर 'हे' पत्र समोर आल्याचं वक्तव्य यावेळी शरद पवार यांनी केलं. राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु असून यामध्ये कुणालाही यश येणार नाही असंही शरद पवार म्हणाले.
आता गृहमंत्री या प्रकरणावर राजीनामा देणार का याचं उत्तर सोमवारी मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदलीनंतर या प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. रोज काही ना काही नवीन बाहेर येतंय. पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी 20 मार्चला मुख्यमंत्र्याना एक पत्र लिहलं आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी मुंबई पोलिसांना महिन्याला 100 कोटी रुपयांचा फंड गोळा करण्याचे निर्देश दिल्याचा खळबळजनक आरोप केला. या व्यतिरिक्त त्यांनी इतरही अनेक आरोप केले असून त्यामुळे राज्यातीलच नव्हे तर देशातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझे प्रकरणावर भाष्य केलं. त्यांनी यावेळी गृहमंत्री अनिल देशमुखांना हटवण्याची मागणी केली. तसेच केंद्र सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. राज ठाकरे म्हणाले की, सचिन वाझे ख्वाजा युनूस प्रकरणात निलंबित होते, मग फडणवीस म्हणतात त्या प्रमाणे सचिन वाझे ह्यांना सेवेत परत घ्या म्हणून उद्धव ठाकरे मागे लागले होते, हेच वाझे शिवसेनेत होते आणि मुकेश अंबानी आधी उद्धव ठाकरे हे घनिष्ट मित्र आहेत. या प्रकरणाची केंद्राने सखोल चौकशी करायला हवी कारण जशी चौकशी पुढे जाईल तशा फटाक्यांची माळ लागेल आणि अनेक धक्कादायक नावं बाहेर येतील, असं राज ठाकरे म्हणाले.