मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्ब प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या भूमिकेवरही बोट ठेवलं आहे. अशातच गृहखातं कोण चालवतं? गृहमंत्री अनिल देशमुख की, शिवसेना नेते अनिल परब? असा परखड सवालही फडणवीसांनी उपस्थित केला आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना जी माहिती दिली, ती म्हणजे सत्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न आहे, असा थेट आरोपही केला आहे. 


विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, "अँटिलियाच्या प्रकरणामध्ये सचिन वाझे यांच्या अटकेनंतर विविध प्रकारचे जे खुलासे होत आहेत, त्यानंतर कालच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि राज्याचे पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांनी पत्राच्या माध्यमातून केलेले खुलासे धक्कादायक आहेत. पण असा खुलासा करणारे परमबीर सिंह हे पहिले व्यक्ती नाहीत, यापूर्वी महाराष्ट्राचे डीजी सुबोध जयस्वाल यांनीही यांसदर्भातील एक रिपोर्ट राज्य सरकार आणि माननिय मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे. पोलिसांच्या ट्रान्सफरमधील रॅकेट, पैशांची देवाण-घेवाण, त्यातली दलाली यासंदर्भातील संपूर्ण माहिती असणारा एक अहवाल तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल यांनी सादर केला होता. हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेला होता, त्यानंतर हा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांकडून गृहमंत्र्यांकडे गेला होता. पण तरिही त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. सुबोध जयस्वाल यांच्यासारखा प्रामाणिक अधिकारी महाराष्ट्र पोलीस महासंचालक पद सोडून केंद्रीय सेवेमध्ये गेले. त्याचं कारण होतं की, सर्व काही जयस्वाल यांनी उघडकीस आणून ही साधी चौकशी लावली गेली नाही."


"मुळात हे प्रकरण होतं यामध्ये महाराष्ट्राच्या इन्टेलिजन्सला फार मोठं बदल्यांचं रॅकेट सुरु आहे. काही दलाल पैसे खात असल्याचं समजलं. त्यामध्ये वारंवार गृहमंत्र्यांचं नाव येतंय, त्यांच्या ऑफिसचं नाव येतंय, ही गोष्ट लक्षात आल्यानंतर थ्रू प्रॉपर चॅनल तेव्हाच्या कमिश्नर इन्टेलिजन्स रश्मी शुक्ला यांनी डीजींना त्यासंदर्भातील रिपोर्ट सादर केला आणि डीजींच्या माध्यमातून तेव्हाचे डीसीएस होमची सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घेऊन काही फोन त्यांनी सर्विलन्सवर लावले. त्या फोनमधून जे काही बाहेर पडलं ते अत्यंत धक्कादायक होतं. म्हणून तो रिपोर्ट सादर झाला, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, त्यावर कारवाई झालीच नाही, तत्कालीन कमिश्नर इन्टेलिजन्सवरच कारवाई झाली. त्यांना पदावरुन दूर करण्यात आलं. त्या रिपोर्टमध्ये ज्यांची नावं आली होती, त्यातल्या अनेक लोकांना त्या-त्या ठिकाणी पदस्थापना देण्यात आली." असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


पाहा व्हिडीओ : गृह विभाग नेमकं कोण चालवतंय? अनिल देशमुख की अनिल परब? : देवेंद्र फडणवीस



शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना अर्धसत्य सांगितलं : देवेंद्र फडणवीस 


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मी शरद पवारांची पत्रकार परिषदही पाहिली, त्यात शदर पवार म्हणाले की, परमबीर सिंह यांची बदली होत असल्यामुळे त्यांनी हा आरोप लावला, मात्र सुबोध जायस्वाल यांची बदली नव्हती, रश्मी शुक्ला यांची बदली नव्हती त्यांनी पुराव्याच्या आधारावर या सरकारकडे रिपोर्ट सादर केला होता. त्याचवेळी यासंदर्भातील योग्य कारवाई झाली असली, तर आज ही वेळ आली नसती. आज शरद पवार यांची पत्रकार परिषद ऐकल्यानंतर मला थोडं आश्चर्य वाटलं, पण मी त्यांना दोष देणार नाही. या सरकारचे निर्माते ते आहेत. त्यामुळे निर्मात्यांना आपलं सरकार कसंही वागलं तरी सरकारला वाचवण्याची भूमिका घ्यावी लागते." 


पुढे बोलताना ते म्हणाले की, "शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की, सचिन वाझे यांना परमबीर सिंह यांनी सेवेत घेतलं. हे खरं आहे. पण शरद पवारांनी अर्धसत्य सांगितलं त्यांनी हे नाही सांगितले की, समितीने गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या आदेशाने सचिन वाझे यांना सेवेत घेतलं. पवार म्हणतात प्रकरणाची चौकशी माजी डीजी रिबेरो यांनी करावी. त्यांच्या बद्दल आदर आहे, मात्र कोणाची चौकशी करावी, परमबीर सिंह यांची की, संपूर्ण प्रकरणाची? आणि एक माजी डीजी आताच्या प्रकरणाची चौकशी करू शकतो का?" असा सवालही फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसेच या सरकारला वाचवण्यासाठी शरद पवारांनी जी पत्रकार परिषद घेतली, ती म्हणजे सत्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न आहे, असंही फडणवीस म्हणाले. तसेच याप्रकरणी मुख्यमंत्री गप्प का? ते काहीच बोलत नाहीत, याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे पापावर पांघरून घालण्यासारखं आहे, असंही फडणवीस म्हणाले. 


"या प्रकरणाची चौकशी जोपर्यंत गृहमंत्री आपल्या पदावर आहेत, तोपर्यंत होऊच शकत नाही, त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेऊन त्यानंतरच चौकशी केली पाहिजे. खरंतर आता गृहखातं कोण चालवतं हाही आमच्यासमोर प्रश्न आहे. गृहमंत्री अनिल देशमुख चालवतात की, शिवसेना नेते अनिल परब चालवतात? कारण ज्याप्रकारे सभागृहात गृहविभागाच्या मुद्द्यांवर गृहमंत्री अनिल देशमुखांऐवजी शिवसेना नेते अनिल परब बोलत होते. त्यामुळे या नियुक्त्यांमध्ये नेमकी भूमिका कोणाची हे स्पष्ट होणं गरजेचं आहे.", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :