मुंबई : मुंबईचे माझी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि राज्याचे माझी गृहमंत्री अनिल देशमुख हे दोघेही एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. मात्र या दोघांमध्ये एक साम्य पाहायला मिळालं, या दोघांचीही चौकशी सुरु आहे. मात्र दोघांमध्येही एक साम्य पाहायला मिळालं ते म्हणजे दोघेही चौकशीला गैरहजर राहिले आहेत. अनिल देशमुख यांची ईडीमार्फत चौकशी सुरु असून ते चौकशीला हजर झाले नाहीत. तर परमबीर सिंह यांची चांदीवाल आयोगामार्फत चौकशी सुरु असून तेसुद्धा पाच वेळा गैरहजर राहिले. हे दोघे नेमके आहेत तरी कुठे?


मुंबई पोलिसांचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर जे आरोप लागले आहेत. त्याची चौकशी चांदीवाल आयोगामार्फत केली जात आहे. मात्र आपलं म्हणणं काय आहे? हे सांगण्यासाठीसुद्धा परमबीर सिंह या आयोगापुढे आले नाहीत. तर दुसरीकडे ईडीकडून अनिल देशमुख यांना चार वेळा समन्स बजावूनही ते ईडीच्या चौकशीला हजर झाले नाही. म्हणजे अनिल देशमुख आणि परमबीर सिंह एकमेकांच्या विरोधात असले तरी या बाबतीत दोघेही एक सारखेच आहेत. मात्र सर्वात मोठा प्रश्न इथे उपस्थित होतो, तो म्हणजे हे दोघे आहेत तरी कुठे?


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परमबीर सिंह यांचा फोन जुलै महिन्यापासून बंद आहे. याआधी त्यांनी सुट्टी वाढवण्याचा अर्ज जुलै महिन्यातच केला होता. मात्र आता त्यांच्याकडून सुट्टी वाढवण्यासाठी नवीन अर्ज केला गेला नाही.


परमबीर सिंह यांना जस्टिस के. यू. चांदीवाला आयोगामार्फत दोन वेळा 25 हजारांचा दंडसुद्धा आकारण्यात आला आहे. मात्र तरीसुद्धा परमबीर सिंह आयोगासमोर आले नाहीत. परमबीर सिंह हे सुट्टीवर जाऊन 118 दिवस झाले आहेत. मेडिकल ग्राऊंडवर त्यांनी शासनाकडून चार महिन्यांची सुट्टी घेतली होती. आज त्यांना कामावर हजर रहायचं होतं. पण ते हजर राहिले नाहीत. परमबीर सिंह नेमके आहेत कुठे? याचाही ठावठिकाणा नाही.


अनिल देशमुख यांना पाचवेळा तर त्यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना दोन वेळा ईडीकडून समन्स बजावण्यात आले. मात्र सुरुवातीला अनिल देशमुख यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा जबाब नोंदवला जाण्याची मागणी ईडीकडे केली आणि त्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं कारण देत पाचही वेळा ते ईडीसमोर आले नाहीत.


पाचही वेळा अनिल देशमुख यांनी आपल्या वकिलांमार्फत ईडीला पत्र पाठवून हजर होण्यासाठी मुदत मागितली होती. मात्र अनिल देशमुख कधीच ईडीपुढे चौकशीला हजर झाले नाही. त्यातच ईडीनं त्यांच्यावरील कारवाईचा धडाका सुरुच ठेवला आहे. अनिल देशमुख आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर छापे टाकले, तर अनिल देशमुख यांची साडेचार कोटींची संपत्ती जप्त केली. अनिल देशमुख असं म्हणाले होते की, कोर्टाचा निकाल आल्यानंतर ते ईडीसमोर हजर होतील. मात्र कोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली, पण त्यांनतरही ते ईडीसमोर हजर झाले नाहीत.


परमबीर सिंह हे सुट्टीवर असून अद्याप हजर झाले नाहीत. आज परमबीर सिंह यांची सुट्टी संपत होती. मात्र आज सुद्धा ते कामावर रुजू झाले नाहीत, तर अनिल देशमुखची स्थिती सुद्धा अशीच काहीशी आहे. अद्याप या दोघांना तपास यंत्रणांनी फरार घोषित केलं नाही. पण तसं असलं तरीही  वेळ मारून नेण्याचा या पद्धतीचा वापर या दोघांकडून अजून किती दिवस केला जाईल आणि तपास यंत्रणा यावर काय तोडगा काढतील ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.