बीड : भगवानगड दसरा मेळाव्याची परंपरा खंडीत करुन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याच्या नवीन अध्यायाला सुरुवात केली आहे. संत भगवान बाबा यांचं जन्मगाव असलेल्या बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे यावर्षी दसरा मेळावा होत आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी आता भगवान बाबांच्या कर्मभूमीतून त्यांच्या जन्मभूमीत दसरा मेळाव्याची परंपरा सुरु केली आहे.
पंकजा मुंडे यांनी 27 नोव्हेंबर 2015 ला एका व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्यांदा गोपीनाथगडा विषयीची माहिती दिली. 12 डिसेंबरला होणाऱ्या दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीला गोपीनाथ गडावर येण्याचं आवाहन केलं. यापूर्वी महाराष्ट्राच्या इतिहासात फक्त एकाच गडाची चर्चा व्हायची, ती म्हणजे भगवानगडाची. आता यात आणखी एका गडाचा समावेश झाला होता. म्हणूनच 27 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या काळात नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्या तीनवेळा बैठका झाल्या.
पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्या वादाची सुरुवात
गोपीनाथ गड... मुंडे समर्थकांचं नवं श्रद्धास्थान... स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक... जिथे भाजपाध्यक्ष आले... मुख्यमंत्री आले... आणि इथेच दोन गडांमध्ये ठिणगी पडली...
भगवानगड भक्तीचा आणि गोपीनाथगड शक्तीचा... नामदेव शास्त्रींच्या या घोषणेने पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्रींमध्ये दरी निर्माण झाली. शक्तीचं विकेंद्रीकरण भगवानगडाला रुचलं नव्हतं.
डिसेंबर 2015 ला सुरु झालेल्या वादाला 5 महिने लोटले. मार्च महिन्यात भगवानगडाच्या फिरत्या नारळी सप्ताहाचं निमंत्रण मुंडे बंधू-भगिनींना मिळालं. पण राजकीय भाषणे होणार नाहीत, असे स्पष्ट आदेश होते.
24 मार्चला एकाच दिवशी दोघे बहिण भाऊ म्हणजे धनंजय आणि पंकजांनी एकाच दिवशी हजेरी लावली. मात्र या दोघांचीही भाषणे सप्ताहाच्या व्यासपीठावर झाली नाहीत. त्यासाठी वेगळे स्टेज उभारण्यात आले होते. दसरा जवळ येत होता आणि मेळाव्यासाठी समर्थक आक्रमक होत होते.
भगवानगडावरील दसरा मेळाव्याची परंपरा काय आहे ?
1965 साली संत भगवान बाबांनी गडावर शस्त्रपूजन करून गडाच्या आजूबाजूच्या 25 गावातील भक्तांनी एकत्र येऊन गडावर दसऱ्याच्या दिवशी उत्सव सुरु केला. पुढे हीच परंपरा महंत भीमसेन महाराजांनी 38 वर्षे चालवली. 1993 साली दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडावर पहिला मोठा सामाजिक कार्यक्रम घेतला.
तत्कालिन मठाधिपती भीमसेन महाराजांचं 2003 साली निधन झाल्यानंतर समाजाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंनी नामदेव शास्त्रींची गडाचे महंत म्हणून घोषणा केली.
गोपीनाथ मुंडे होते, तोपर्यंत राज्यभरातील भगवान बाबांचे लाखो भक्त आणि मुंडे समर्थक गडावर यायचे. गोपीनाथ मुंडेंच्या पुढाकाराने राज्यातील दिग्गज या कार्यक्रमाला हजेरी लावत होते.
भगवान बाबांच्या कर्मभूमीत जमलं नाही ते आता जन्मभूमीत जमणार?
भगवानगडावरील याच ठिकाणी एक स्टेज होतं, ज्या स्टेजवरून गोपीनाथ मुंडे भाषण करायचे. ते स्टेज गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर पाडण्यात आलं. गोपीनाथ मुंडेंनंतर इतर कोणालाही या ठिकाणाहून भाषण करण्यास मज्जाव करण्यात आला होता.
दरी आणखी रुंदावली. चर्चेच्या फेऱ्या कधीच थांबल्या. दसरा उजाडला, लाखो मुंडे समर्थक भगवानगडाच्या पायथ्याला जमले. पंकजा मुंडेंचा ताफा थेट भगवानगडावर दाखल झाला.
गेल्या वर्षी दोन गट निर्माण झाल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात होती. पण पंकजा मुंडेंच्या आवाहनाने वातावरण निवळलं. यंदाही या निखाऱ्यांना पुन्हा हवा मिळाली असती. पण पंकजा यांनी सभेचा मुक्काम भगवान बाबांच्या जन्मगावी वळवला आणि पुन्हा दरी रुंदावली. भगवान बाबांच्या कर्मभूमीत जमलं नाही ते आता जन्मभूमीत जमणार का? हे या दसरा मेळाव्याला दिसणार आहे.
भगवान बाबांच्या कर्मभूमीत जमलं नाही ते आता जन्मभूमीत जमणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Sep 2017 05:34 PM (IST)
संत भगवान बाबा यांचं जन्मगाव असलेल्या बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे यावर्षी दसरा मेळावा होत आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी आता भगवान बाबांच्या कर्मभूमीतून त्यांच्या जन्मभूमीत दसरा मेळाव्याची परंपरा सुरु केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -