मुंबई : नवबौध्द समाजातील नागरिकांना आता अल्पसंख्याक समुदायाचा दर्जा मिळणार आहे. त्यामुळे बौध्द समाजाप्रमाणेच सुविधा नवबौद्ध समाजाला मिळणार आहेत. राज्य सरकारनं हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. राज्यातील सुमारे 50 लाख नवबौध्द नागरिकांना हा लाभ मिळणार आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांच्या अनुयायांनी बौध्द धर्माची दीक्षा घेतली. धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जातीचे लाभ देण्यासाठी 'नवबौद्ध' ही संज्ञा वापरली जाते. मात्र अल्पसंख्यांकाना मिळणाऱ्या सुविधा यापूर्वी नवबौद्धांना मिळत नव्हत्या.

बौद्ध अल्पसंख्य कायदेशीर दर्जा 1956 पासून नवबौद्धांना आपोआप प्राप्त झाल्याने त्यांना अल्पसंख्याक समाजासाठी असलेल्या सर्व योजनांचा लाभ घेता येईल, असं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे.

पूर्वीच्या अनुसूचित जातीतील व्यक्तींनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर कायद्यानुसार त्यांना अनुसूचित जातीच्या सवलती देता येत नव्हत्या. महाराष्ट्रात 1960 पासून त्यांना अनुसूचित जातीच्या सवलती देण्यास सुरुवात झाली. सरकारी अभिलेखातही त्यांचा 'नवबौद्ध' असाच उल्लेख आजही केला जातो.

1990 साली केंद्र सरकारने अनुसूचित जातीमधील व्यक्ती बौद्ध धर्मात धर्मांतरित झाल्यास त्यांना अनुसूचित जातीचे लाभ मिळण्यासाठी अधिसूचना काढली होती. त्यामुळे नवबौद्धांना बौद्ध धर्माचे आचरण करताना अनुसूचित जातीसाठी असणारे लाभ कायदेशीररित्या मिळतात.