मुंबई : महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अंगणवाडी सेविकांना 'मेस्मा' कायदा लागू करण्याला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यामुळे पंकजा मुंडे तोंडघशी पडल्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात केलेल्या घोषणेवेळी पंकजा विधानसभेत गैरहजर राहिल्याचं म्हटलं जातं.


अंगणवाडी सेविकांना 'मेस्मा' लागू करण्यास स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यामुळे महिला आणि बालविकास खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरु आहे.

गेले तीन दिवस विधानसभेत आणि विधान परिषदेत 'मेस्मा'चा विषय उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी अंगणवाडी सेविकांना हा कायदा लागू राहील, अशी ठाम भूमिका पंकजा मुंडे यांनी घेतली होती.
अंगणवाडी सेविकांवरील ‘मेस्मा’ अखेर स्थगित

बुधवारी शिवसेनेसह विरोधीपक्षांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी करत विधानसभा आणि विधानपरिषदेत गोंधळ घातला होता. तेव्हाही या मुद्यावर पंकजा मुंडे ठाम होत्या.

गुरुवारी सकाळी मुख्यमंत्र्यांनी अचानक 'मेस्मा' कायद्याला स्थगिती देण्याची घोषणा विधानसभेत केली. यावेळी पंकजा मुंडे विधानसभेत उपस्थित नव्हत्या.
अंगणवाडी सेविकांना 'मेस्मा' नको, विधानसभेत शिवसेना आक्रमक

खरं तर, अंगणवाडी सेविकांना मेस्मा लागू करण्याचा निर्णय पंकजा मुंडे यांनी घेतला होता. हा विषय मंत्रिमंडळासमोरही आणला नव्हता. त्यामुळे 'मेस्मा'बाबत मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे यांच्यात मतभेद होते का अशी चर्चा रंगली आहे.

दुसरीकडे, पंकजा मुंडे यांनी काल केलेल्या फेसबुक पोस्टमधून त्या दुःखी असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. वडील गोपीनाथ मुंडे यांची कमतरता भासत असल्याच्या भावना पंकजांनी व्यक्त केल्या. यातूनच पंकजा मुंडेंच्या मनात अस्वस्थता असल्याचं म्हटलं जात आहे.