मुंबई : एकीकडे बारावीची परीक्षा सुरु असली, तरी बारावीचा निकाल वेळेत लागेल याची शाश्वती नाही. कारण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतच्या कालच्या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने आपलं आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

येत्या 26 मार्च रोजी मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशारा शिक्षक महसंघाने दिला आहे. पण तरीही शासनाने निर्णय न घेतल्यास तपासलेल्या उत्तर पत्रिका आणि मार्कशीट बोर्डात जमा न करण्याचा निर्णय संघटनेनं घेतला आहे. याचा निकालावर परिणाम झाल्यास शासन जबाबदार असेल असंही संघटनेनं म्हटलं आहे.

याआधीही 5 मार्चला शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचं आंदोलन मागे घेतलं होतं. पण अजूनही शासनाने प्रमुख मागण्यांवर निर्णय घेतला नाही.

दुसरीकडे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या बहिष्कारासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे जबाबदार असून, त्यांच्यामुळे शिक्षकांवर संप करण्याची वेळ आली आहे. असा घरचा आहेर भाजप समर्थित शिक्षक आमदार नागो गाणार यांनी दिला आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार 5 जून पूर्वी 12 वीचा निकाल लागणे अपेक्षित आहे. पण शिक्षकांच्या आंदोलनामुळे बारावीचे 65 लाख पेपर तापसणीविना पडून आहेत.