मुंबई: आजचं राजकारणं हे पूर्वीसारखं राहिलं नाही, राजकारणात अनेक गोष्टी या मनाच्या विरोधात कराव्या लागतात, त्यामुळे राजकारण सोडावं असं रोज वाटतं, विचारांशी तडजोड करुन मी राजकारण करु शकत नाही असं पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या. पण त्यावर मात करुन आजही राजकारणात जिद्दीने उभी आहे असंही त्या म्हणाल्या. भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुडे, खासदार प्रितम मुंडे आणि यशश्री मुंडे या मुंडे भगिनी एबीपी माझाच्या माझा महाकट्टा (Majha Maha Katta) या कार्यक्रमामध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.


मला राजकारण सोडावं असं रोज वाटतं असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, मी राजकारण सोडावं अशी इच्छा बाबांना 1 जून 2014 रोजी सांगितली. त्यानंतर 3 जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. अनेक वेळा राजकारणात काही नको असलेल्या गोष्टी कराव्या लागतात. मी मंत्री असताना एका महिला आयएएस अधिकाऱ्याविरोधात माझे आमदार एकत्र आले होते, त्यावेळी मी त्यांना नाराज करुन त्या अधिकाऱ्याची बाजू घेतली. राजकारणात निगरगट्ट असावं लागतं, अनेक चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागतं, पण ही गोष्ट माझ्यात नाहीत. राजकारण सोडावं असं मला रोज वाटतं, पण दुसऱ्याच क्षणी पुन्हा जिद्दीने उभा राहण्याची शक्ती येते. विचारांशी तडजोड करुन मी राजकारण करु शकत नाही. 


सध्याचा काळ हा राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अनसर्टेनिटीचा आहे. आम्ही नेहमीच विरोधात राहिलो, पण सत्ता नसतानाही आमच्याकडे आत्मविश्वास होता, आमची एक पोझिशन होती, ती गोष्ट आताच्या राजकारण्यांत दिसत नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या. 


आमचे बाबा माऊली होते, त्यांची उणीव जाणवते- पंकजा मुंडे


आमचे बाबा खूप मायाळू होते, त्यांची आठवण नेहमी येते. आमचे बाबा माऊली होते, त्यांनी आमच्यावर प्रचंड माया केली असं पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल बोलताना सांगितलं. पंकजा मुंडे म्हणाल्या, आम्ही जे आयुष्यात जे काही करतो तो कुटुंब म्हणून करतो. प्रितम प्रॅक्टिकल विचार करणारी, मला बीग ब्रदर सिंड्रोम असल्याने मी अनेक गोष्टी करायचा प्रयत्न केला असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, "आम्ही जे काही बोलतो ते टिपिकल बोलतो, पण आम्ही ज्या वेळी राजकीय बोलतो, त्यावेळी मात्र माझ्या बहिणी माझ्या बाजूने असतात. माझा जो राजकीय मित्र तो यांचा मित्र, माझा जो राजकीय शत्रू असतो तो यांचा शत्रू असाच विचार करतात. आम्ही एकमेकांचा विचार करतो, एकमेकांसाठी करतो."


तो काळ परत आणता आला तर... 


गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल आठवण सांगताना पंकजा मुडे म्हणाल्या की, बाबा गृहमंत्री असताना मुंबईत रामटेक या बंगल्यावर राहायला होतो. त्यावेळी खूप आनंद वाटायचा, कारण रात्री बाबा घरी यायचे आणि आम्ही सगळे डायनिंग टेबलवर एकत्रित जेवायला बसायचो. त्यामध्ये धनंजय, यशत्री पासून ते मुंडे- महाजन कुटुंबातील सर्व सदस्यांचा समावेश होता. तो काळ जर परत आला तर आनंद वाटेल. 


गोपीनाथ मुंडे आज जर असते तर आजचं राजकारण वेगळं असतं असं खासदार प्रितम मुंडे म्हणाल्या. गोपीनाथ मुंडे यांना परत आणता आलं असतं तर नक्की आणलं असतं असंही त्या म्हणाल्या. 'मनातली मुख्यमंत्री' या वाक्याचा मला कधीही त्रास झाला नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या. ज्याला ही गोष्ट मला चिकटवायची असेल त्याला ते करु द्या, उलट या गोष्टीचे मी आभार मानते असं त्या म्हणाल्या.